हरिश्चंद्रगड
एक तपोभूमी, भटक्यांची पंढरी, सह्याद्रीचा मुकुटमणी ही सगळी विशेषणं कुणासाठी वापरली जातात, असा प्रश्न विचारला, तर हरिश्चंद्रगड हे एकमेवाद्वितीय नाव समोर येतं.
कित्येक उपमा, उपाध्या मिरवणारा हरीश्चंद्रगड. अर्थात, त्या सर्वच उपाध्या सार्थच म्हणाव्यात, किंबहुना कमीच पाडव्यात असाच आहे हा गड. इतका सुंदर, इतका मोहक, की एकदा भेट देणारा मनुष्य पुन्हा आला नाही, असं होणं केवळ अशक्य.
हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे. येठील शिखर अहमदनगर जिल्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंचीवर आहे
हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो.
महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही.
या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच सुमारे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. येथील मंदिर कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या नावावरूनच जमातीची ओळख आहे. संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्व महादेव मंदीर हि या जमातीचे प्रतीक आहेत.
१७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून महादेव कोळी समाजाचे कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे (आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वडील ) होते. इंग्रजांनी 1818 मध्ये हा किल्ला जिंकला.
हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती.
पावसाळ्यात या गडाचे सौदर्य काही औरच असते. वनस्पतींची विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारवीच्या जाळी , धायटी , उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणिवैभव मात्र शिकारींमुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. तारामती य गडाचे सर्वोच्च शिखरावरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो. अशा तहेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ’ट्रेकर्सची पंढरी’ ठरतो.
पाचनईकडील वाट
हरिश्चंद्रगडावर जाण्याची वाट पाचनई मार्गे अहमदनगर जिल्ह्यातूनही आहे. यासाठी मुंबई-नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी जावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते.
राजुर-पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे १.५ - २ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई गाव उंचावर असल्याने येथून गड गाठायला जास्त कष्ट पडत नाहीत. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे 3.5 कि.मी. आहे.
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर
येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.
हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे.
मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते.
मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते.तसेच गडाच्या द्शिन बाजुने पुष्पावती व काळु या नद्या उगम होतो. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाया गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत 'चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात.
‘शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥ हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा ॥’
हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबावर, भिंतीवर आढळतात. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून ‘तत्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला. येथील एका शिलालेखावर, चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ॥ अशा ओळी वाचता येतात. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे. या छोट्या मंदिरासमोरच एक भाग्न अवस्थेतील मूर्ती आहेत. त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबाऱ्यांच्या घरी कावडीने पाणी भरत असलेला प्रसंग चित्रित केला आहे.
कोकणकडा
हे या किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याची सरळधार १७०० फूटा भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणतः ४५०० फूट भरते. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू 'U' या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो.संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे.
तारामती शिखर
तारामती शिखर गडावरील व जिल्हातील सर्वात उंच शिखर आहे. उंची साधारणतः ४८५० फूट्.. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फुटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजूबाजूला अनेक गुहा आहेत. त्यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखे लागतात. माथ्यावर दोनतीन शिवलिंगे आहेत.
केदारश्वराची गुहा :
मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते. याला केदारेश्वराची गुहा असे म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कमरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबावर तोलली होती पण सद्यःस्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोलीही आहे. खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते.
तसेच आम्ही हरिश्चंद्रगडावर व गडाखाली घरगुती जेवणाची व राहण्यासाठी टेंट ची व्यवस्था करतो व मार्गदर्शनासाठी लोकल गाईड मिळेल.
अधिक माहितीसाठी संपर्क:-Hotel Kokankada 8308081939
Call / Whatsapp