हंपी - सूर्यास्त

Tripoto
26th Feb 2023
Photo of हंपी - सूर्यास्त by Prashant Dilip Kulkarni
Day 1

हंपी - सूर्यास्त
माझ्या मित्रानं हंपी ला जाताना बजावल होत "अरे गेलास ना की तीन गोष्टी सोडू नकोस. एक म्हणजे सूर्योदय, दुसरं सूर्यास्त आणि तिसरं म्हणजे coracle boat ride." आणि खरंच हो. जसा सुर्योदय अप्रतिम होता तसा सूर्यास्त पण. एक इव्हेंट होता असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. विरूपाक्ष मंदिर अगदी मध्यवर्ती भागात आहे. Easily accessible. त्याच्याच दक्षिणेला हेमकुटा टेकडी आहे. टेकडीवर बरीच मंदिर आहेत, हेमकुटा मंदिर समूह असाच त्याचं नावं आहे. टेकडी चढायला सुरुवात केली.
वळणा वळणाची चढण, मध्येच पठारी भाग दम खायला,  झाडं झुडपे आणि पायवाट असं एक चित्रं असतं टेकडीच. इथं ती कॉन्सेप्टच बदलेली. एक भल्या मोठ्या गोलाकार, पिवळ्या धम्मक दगडाचा तीव्र उतार. पाण्याचे ओहोळ येऊन तेवढ्या पुरती जागा पिवळ्याची तपकिरी झालेली.
एक सलग चढाव दम काढतो. चांगलीच धाप लागते वरती पोहोचे पर्यंत. पठार गाठलं तेव्हा तेजोनिधी लोहगोल अजून उग्रावस्थेत होते. अगदी मोजकीच मंडळी होती. दक्षिण पश्चिम टोकाला दगडाचे बाक केले होते. बरेच होते. इतके बाक कश्यासाठी हे समजेना.
आजू बाजूला उंच डोंगरावर सांडलेले दगड होतेच.
जसं जसं भास्करांन नारंगी रूप घेतलं तसं तसं गर्दी वाढू लागली. बरेच जण माझ्या सकट मोबाईल आणि कॅमेरे यात गुंग होते. माझा angle कसा भारी, अरे एकडून घे, दोन देवळांच्या मधून घे असं काही बराचस ऐकू येत होतं.
त्यात कोणाची पिशवी उचल, मोबाईल पळव, कुत्र्यांच्या पाठी पळ असा खेळ त्या माकडांचा चालू होता. पण सूर्य नारायण उग्रपणा सोडून सौम्य झाले तेव्हा मला माझ्या आजोबांची आठवण झाली.  साठी मधले कडक असणारे आपले आजोबा ऐंशीव्या वर्षी अगदी सौम्य होतात, हातावर चॉकलेट ची वडी ठेवतात तस काही. आता मात्र सगळे अंतर्मुख झालेले. कॅमेरा -
मोबाईल बाजूला ठेऊन प्रत्येकानं एक एक जागा पकडली.
सूर्यास्त अनुभवण म्हणजे काय, हे फक्त आम्हा चार पाच लोकांनाच कळलं आहे हा भ्रमाचा भोपळा क्षणात फुटला.
समुद्रा वरचा सूर्यास्त लोकांचं हरवलेलं तारुण्य परत आणायला मदत करतो, तर ह्या टेकडीवरचा सूर्यास्त ऐन तारुण्यात गांभीर्य आणणारा होता.
विशेष म्हणजे त्या दक्षिण मध्य भारतातल्या ह्या ऐतिहासिक गावातल्या एका छोट्याश्या टेकडीवर बरेच परदेशी पाहुणे सुद्धा सुर्यास्ताचा सोहळा अनुभवायला जमले होते.
एखाद्याला निरोप देणं इतकं अवघड असतं का?
हे सारं झालं पृथ्वी वरच्या सर्वांत हुशार प्राण्या बाबत.
पण आजू बाजूच्या, दगडांनी भरलेल्या टेकड्या डोकं वर काढून त्या सूर्यनारायणाला निरोपच देत होत्या का?
आणि तो ही आपला पिवळा नारंगी रंग त्या टेकड्यांवर, माणसांवर पसरवून त्यांचा निरोप स्वीकारत होता का? तो ही तितकाच गहिवरला असेल का? अखेर सूर्य ढगांच्या आड लवकरच गुडूप झाला. सर्वांना जाग आली. आणि इतक्यात माझ लक्ष्य माणसांना accessible नसलेल्या एका उंचावट्यावर गेलं. इतकावेळ सगळ्यांना त्रास देणारी ती माकड, ५०-६० माकडांची अख्खी टोळी त्या उंचावट्यावर पश्चिमेकडे तोंड करून बसलेली दिसली. असं वाटलं की ते सुद्धा सुर्यास्तची वाट पाहत होतीत. ते ही अंतर्मुख झाले असतील का? काय विचार करत असतील ते सगळे कोण जाणे? आता मात्र सगळे पुन्हा आधिभौतिकात येऊन WhatsApp, Insta मध्ये शिरले माझ्या सकट आणि काही वेळासाठी थांबलेली पृथ्वी पुन्हा एकदा सुरू झाली. नशीब माझं.
- प्रशांत दिलीप कुलकर्णी

Photo of हंपी - सूर्यास्त by Prashant Dilip Kulkarni
Photo of हंपी - सूर्यास्त by Prashant Dilip Kulkarni
Photo of हंपी - सूर्यास्त by Prashant Dilip Kulkarni
Photo of हंपी - सूर्यास्त by Prashant Dilip Kulkarni