१) लोहगड किल्लाची माहिती / Lohagad Fort Information
नमस्कार मित्रानो, जय भवानी जय शिवाजी! येथे आपण लोहगड किल्ल्याची माहिती मराठीमध्ये देणार आहोत. तर आम्ही लोणावळा फिरण्यासाठी गेलो होतो खूप मज्जाही केली, तर तेथील सर्वात भारी भेट म्हणजे लोहगड किल्ला, तर आज आम्ही तुम्हाला लोहगड किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आणि लोहगडाची संपूर्ण माहिती देणार आहोत.
२) किल्ले लोहगड इतिहास आणि माहिती / Lohagad Fort Information And History
लोहगड हा किल्ला लोणावळ्याजवळ आहे सदर किल्ला हा समुद्र सपाटीपासून ३४२० फुट उंचीवर आहे भारत सरकरने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
तर चला जाणून घेयुयात आपण लोहगड बद्दल.
इतिहास / History
या किल्याला अनेक वर्षाचा इतिहास लाभला आहे. लोहगडावर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्वांची राजवट राहिली आहे. सदर किल्ला हा अतिशय मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. किल्ल्यापासून जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पू. सातशे वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी.
इ.स. १४८९ साली मलिक अहमद यांनी निजामशाहीची स्थापना केली व स्थापनेनंतर सर्व किल्ले जिंकून घेतले. लोहगड किल्ला हा त्यापैकीच एक आहे. इ.स. १५६४ साली या किल्ल्यात अहमदनगरचे सातवा राजा दुसरे बुऱ्हाण निजाम कैदीत होते. त्यानंतर इ.स. १६३० मध्ये हा किल्ला आदिलशाहीत समाविष्ट करण्यात आला. शिवाजी महाराजांनी आपली सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी इ.स. १६५७ मध्ये कल्याण व भिवंडी परिसर जिंकलाच लोहगड–विसापूर हा किल्लाही आपल्या ताभ्यात घेतला.
त्यानंतर इ.स. १६६५ मध्ये राजा जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात झालेल्या तहामुळे हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन करण्यात आला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी पुन्हा एकदा किल्ला परत जिंकला.
पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स. १७१३ मध्ये शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा-शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखी खाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या.
इ.स. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसर्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
3) पाहाण्यासारखी ठिकाणे / Places to visit
१. गणेश दरवाजाः- गणेश दरवाज्याचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाज्याच्या उजव्या व डाव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटिलकी देण्यात आली होती. येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.
२. नारायण दरवाजाः- नारायण दरवाजा हा नाना फडणवीसांनी बांधला होता. दरवाज्याजवळ एक भुयार आहे या भुयाराचा वापर हा भात व नाचणी साठवून साठवून ठेवण्यात येई.
३. हनुमान दरवाजाः- हनुमान दरवाजा हा सर्वात जुना व प्राचीन दरवाजा आहे
४. महादरवाजाः- महादरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा असून या वरती हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्याही दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले होते.
महादरवाज्यातून आतमध्ये गेल्यावर एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखान्याचे भग्र अवशेष आढळतात. दर्ग्याच्या बाहेर बांधकामासाठी लागणारा चुना बनविण्याची घाणी आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी आहे. ध्वजस्तंभाच्या शेजारी काही शिवप्रेमींनी सिमेंटचा चौथरा बांधला असून त्या ठिकाणी तोफ आहे. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवटयाचा भाग आहे. तेथे एक शिवमंदिर आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. हेतळे अष्टकोनी आकाराचे आसुन. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आहे. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केलीआहे. मोठा तळ्याच्या पुढे जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात. गडावरून विंचवाच्या नांगीसारखा दिसणारा भाग म्हणजे विंचूकाटा, लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे.
विंचुकाटा बघून आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे विंचुकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो म्हणून यांस विंचुकाटा असे म्हणतात. विंचुकाट्याच्या टोकाला काही जण कडेलोट असेही म्हणतात तेथून आपणास किल्ले विसापूर नजरेस पडतो.
४) लोहगडाला कसे जायचे / How To Go Lohagad
मुंबई पुणे महामार्गाजवळील नावाजलेला किल्ला म्हणजे लोहगड. आम्ही मुंबईमधून सकाळी ६.१४ ची इंद्रायणी एक्स्प्रेस पकडली ती लोणावळ्यात ८ वाजता पोहचली. लोणावळ्यात पोहोचल्या नतंर लोणावळा स्टेशन जवळच्या होटेल मध्ये आम्ही नाश्ता केला. त्यानतंर आम्ही लोणावळा स्टेशनला आलो. लोणावळा स्टेशनवर आल्यावर आम्ही मळवलीला जाणारी ८.२० ची लोकल पकडली. ती लोकल ८.३० ला मळवली स्टेशनवर पोहचली. मळवली स्टेशन ते लोहगड पर्यंतच अंतर ५.५ किलोमीटर आहे. आम्हाला चालत जायला १ तास ३० मिनिटे लागली. त्यानंतर आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलो.
पायथ्याला पोहोचून आम्ही १०.१० ला गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. गडावरती येताना ४ दरवाजे लागले पहिला गणेश दरवाजा, दुसरा नारायण दरवाजा, तिसरा हनुमान दरवाजा आणि चौथा महादरवाजा. महादरवाजामधून वरती आल्यावर आम्हाला एक भगवा झेंडा दिसला तेव्हा समजले की आम्ही गडावर पाेचलो. दुपारी १२.३० वाजता गडावर पोहोचल्यावर आम्हाला गडाची माहिती व महत्व अक्षय आणि उदय दादाने सांगितले. तेथे आम्ही फोटो काढले. त्यानंतर आम्ही विंचुकडावर गेलो.
आत्तापर्यंत चांगलीच भूक लागली होती कधी एकदा कुठे थांबतोय आणि जेवतोय असे झाले होते पण पाऊस पडत असल्यामुळे गडावरती जेवण करणे शक्य झाले नाही. आम्ही विंचूकाट्याकडून महादरवाज्याच्या दिशेने यायला निघालो. २ वाजता गडावरूनखाली येताना बऱ्यापैकी धुके कमी होते तेव्हा समोरच असलेला विसापूर, तुंग आणि तिकोना या तिन्ही गडांचे दुरूनच दर्शन झाले. १ तासामध्ये आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलो. गडाच्या पायथ्याला काही हॉटेल आहेत. तेथे जाऊन आम्ही जेवन केले. त्यानंतर तेथून आम्ही रिक्षा पकडली मळवली स्टेशनला जाणारी ३ वाजून ५० मिनिटाला आम्ही मळवली स्टेशनला पोहोचलो. मळवली स्टेशन वरून सायंकाळची ४ वाजून ०५ मिनिटाची लोकल पकडली ती लोकल ४ वाजून २० मिनिटाला लोणावळा स्टेशन वर पोहोचली. त्यानंतर आम्ही ६ वाजून ४७ मिनिटाची इंटरसिटी एक्सप्रेस पकडली आणि आम्ही ८ वाजून २० मिनिटांनी ठाणे स्टेशन वर पोहोचलो.
आम्ही रविवारचा दिवस पूर्णपणे आनंदात जगलो.
५) लोहगडला भेट देण्यासाठीचे सर्वोत्तम महिने / Best Months To Visit Lohagad
लोणावळ्यात, लोहगड किल्ला हे पर्यटन स्थळांचे आकर्षण आहे आणि तेथे जाण्यासाठी सर्वात उत्तम महिने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा सर्वात उत्तम काळ मानला जातो.
६) लोहगडला भेट देण्यासाठीची उत्तम वेळ / Best Time To Visit Lohagad
लोहगड किल्लाला भेट देण्यासाठीची उत्तम वेळ सकाळी ७.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरु असतो.
७) लोहगड खर्च / Lohagad Budget
मुंबई ते लोणावळा परत येणे किंवा जाणे तिकिट (Mumbai To Lonavala Return Ticket) - १८० रुपये (Rs.180)
लोणावळा स्टेशन ते मलवली स्टेशन परत येणे किंवा जाणे तिकिट (Lonavala Station To Malavali station Return Ticket) - १० रुपये (Rs.10)
लोहगड प्रवेश शुल्क (Lohagad Entry Fees) - २५ रुपये (Rs.25)
लोहगड ते मलवली स्टेशन रिक्षा प्रति व्यक्ती खर्च (Lohagad To Malavali Station By Auto Per Person Cost) - ५० रुपये (Rs.50)
एकूण खर्च (Total Cost) - २६५ रुपये (Rs.265)