
लोणावळा खंडाळ्याच्या कुशीत वसलेलं राजमाची हे छोटंसंच पण निसर्गरम्य ठिकाण. निसर्गाने या जागेला भरभरून दिलंय. उल्हास नदीच्या खोऱ्यातली घनदाट झाडी, प्रचंड धबधबे, उसळणारे ढग आणि अगणित वनस्पती असं सगळं एकच ठिकाणी एकाच वेळी पाहायला मिळणं तसं दुर्मिळच. मनोरंजन आणि श्रीवर्धन असे 2 जुळे गड असलेला राजमाची फार दिमाखात उभा राहिलेला दिसतो. याच राजमाचीला जाण्यासाठी 18 जण मुंबईहुन आणि 5 जण पुण्याहून निघाले. भेटीचं ठिकाण ठरलं लोणावळा रेल्वे स्टेशन.
2 दिवसांचे कपडे, खाऊ आणि इतर बारीकसारीक गोष्टींनी भरलेल्या बॅग्स घेऊन चेन्नई एक्सप्रेस ने एकदाचं दादर स्टेशन सोडलं. रेल्वेने ठाणे स्टेशन सोडलं आणि दोन्ही बाजूंना हिरवागार निसर्ग दिसू लागला. खंडाळ्याच्या घाटातले बोगदे, दगडी पूल एक येऊ करत एकदाचं लोणावळा स्टेशन गाठलं.
पुढे साधारण एक सव्वा तासाच्या जीप प्रवासानंतर एक वेगळंच जग डोळ्यांसमोर उभ ठाकलं. ना कसला भंपकपणा ना कसली गजबज ना गोंगाट तरीही भल्याभल्या सौंदर्यस्थळांना मात देईल असं समृद्ध उल्हास नदीचं खोरं.
जीप मधून उतरताच डोळ्यांसमोर काळ्याभिन्न पाषाणाची नसर्गिक तटबंदी लाभलेला राजमाची दिसला तेव्हा पुढे काय दिव्य पार पडायचं याचा थांगपत्ता ही नव्हता.
संध्याकाळी 6:00 वाजता "एक कदम दो कदम" करत प्रवास सुरु झाला. वेळ सरू लागली तसा हळूहळू प्रकाश कमी होऊ लागला, गारवा आणि धुकं वाढू लागलं आणि वाट दिसेनाशी होऊ लागली. हातात टॉर्च घेऊन मार्ग काढत एका मागे एक 23 जणांचं टोळकं आगेकूच करू लागलं सोबतीला पाऊस होताच.
आषाढीच्या चंद्राचं हसू अजून थोडं खुललं होतं. जणू ढगांआडून हळूच बघून गालीच हसत होता. रात्र चढू लागली आणि काजवं दिसू लागली. चिखलाने भरलेल्या वाटेवर चालत पाय बोलू लागले. दिसेल तिथे पाण्याचे झरे शोधून थंडगार पाण्यात उभं राहिलं की शीण कमी झाल्यासारखा वाटू लागे.
जवळपास 2:30-3:00 तास चालून 12 किलोमीटरच्या पायपिटीनंतर उधेवाडी गावाचा बोर्ड दिसला आणि एकच आनंद झाला. गावात पोहोचेपर्यंत चंद्राने पूर्णपणे डोकं वर काढलं होतं. थकली भागलेली मंडळी भाकरी, भाजी, वरण-भातावर ताव मारून गाढ झोपी गेली.
भल्यापहाटे उठून चहा पोहे मट्ट करून किल्ला सर करायला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यातल्या दगडी पायऱ्या चढून वर गेलो आणि भगवा मोठ्या तोऱ्यात फडकताना दिसला. ढग डोळ्यांसमोर तरंगू लागले आणि नागमोडी वळणाचा खडकाळ रस्ता पार करून श्रीवर्धन किल्ल्याचं प्रवेशद्वार दृष्टीक्षेपात आलं.
किल्याचे थोडेफार अवशेष अजूनही पाय रोवून उभे आहेत. दुहेरी तटबंदी असलेला किल्ला बऱ्यापैकी सुस्थितीत असल्यामुळे फार सुंदर दिसतो. किल्ल्यावर पाण्याची बरीच टाकी आहेत. एकाबाजूला उत्तुंग कातळातला गड आणि दुसऱ्याबाजूला दरी मधून काढलेल्या पायवाटेवर चालत वारा, धुकं अंगावर घेत टोक गाठणं हा अनुभव म्हणजे काही औरच.
गडमाचीवर गेल्यावर खाली खोल दारी आणि समोर कातळधार धबधबा दिसला आणि 12 किलोमीटर ची पायपीट आणि 2710 फुट सर केलेली उंची सार्थकी लागली. जणू आकाशातूनच एकसंथ धारा बरसत होत्या आणि कातळावर जाऊन आपटत होत्या आणि अचानक लक्षात आलं की याच धबधब्यावर आपण काल उभे होतो. थोडी अतिशयोक्तीच वाटेल पण कातळधार पासून किल्ल्यापर्यंतचा घोड्याच्या नालेसारखा आकार (U) असलेला प्रवास आपण पायी केल्याचं कळताच स्वतःचीच पाठ थोपटावीशी वाटली. किल्ल्यावरून खाली उतरलो आणि उधेवाडीच्या खालच्या बाजूला असलेल्या उदयसागर तलावाजवळ गेलो. ओसंडून वाहणाऱ्या या तलावात हौशी मंडळींनी लग्गेच सुरु मारले. अचानक पावसाने जोर धरला आणि तलावातलं पाणी अधिकच गार वाटू लागलं. बाजूलाच असलेल्या हेमाडपंथी गोधनेश्वर देवळातल्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं. सातवाहन काळातलं हे 24 खांबी देऊळ आजही अगदी तसंच आहे. वेळेअभावी मनोरंजन गड सर नाही करता आला. परत येऊन गरम गरम पिठलं भाकरी वर ताव मारला आणि परतीचा प्रवास सुरु केला. 12 किलोमीटर चालून परत जीप्स उभ्या असलेल्या जागी आलो तेव्हा दरीपलीकडला राजमाची पुन्हा डोळ्यांसमोर उभा ठाकला. परत निघताना धुक्याआड लपलेला राजमाची मनसोक्त डोळ्यात साठवून घेतला आणि घराकडे जाणाऱ्या गाडीमधली सीट पकडली...
- नम्रता बर्वे
14 जुलै 2019


























