सुधागड
भोरपगड
सवाष्णी घाटाचा पहारेकरी
किती अन् काय काय सांगावं...
झाडांमध्ये लपलेला गड म्हणावं की विस्तृत किल्ला...
चढायला तसा सोप्पा पण गर्द झाडीने घेरलेला, कुठे अरुंद तर कुठे प्रशस्त वाटा, मध्येच टोकावरचा दिसणारा बुरुज तर मध्येच गुडूप होणारी वाट...नजरेला हुलकावणी देणारा तरी नयनरम्य असा सुधागड अर्थात भोर संस्थानचे वैभव.
ट्रेकर्स ची जणू काळजीच असावी गडाला..म्हणून की काय अख्खी वाट अगदी मोजून मापून तयार केल्यासारखी वाटे. मध्येच खडकाळ चढ मग पायांना थोडासा आराम देणाऱ्या पायऱ्या..परत खडकाळ चढ आणि मग परत पायऱ्या...२०३० फूट उंची या पयाऱ्यांमुळे थोडीशी सोप्पी होऊन गेली
स्वच्छ, नितळ पाण्याचे झरे, गर्द झाडांमुळे मिळणारी सावली आणि पहावे तिकडे दिसणारी हिरवळ यांमुळे पाऊस नसतानाही ट्रेकिंग अगदी आल्हादायी झालं.
गड सर करताना २ लोखंडी शिड्या लागल्या...वाऱ्याचा वेग इतका की लोखंडी पायऱ्या ही झुलत होत्या. वाटेत भेटलेल्या शेरू (कुत्रा) ही अखेरपर्यंत साथ दिली. अखेर १ तास ५० मिनिटांनंतर दृष्टीस पडलं ते विस्तृत पठार...नजर जाईल तिकडे हिरवळ..लांब लांब पर्यंत फक्त हिरवळ. समोर दिसणारे तैलबैल्या, टकमक टोक आणि भव्य रायगड सह्याद्रीच्या वैभवाची आणि सौंदर्याची पदोपदी जाणीव करून देत.
गडमाथ्यावर पोहोचल्यावर भोराई देवीचे दर्शन घेतले देवळात फारसा उजेड नाही त्यामुळे मूर्ती थोडी अंधुकच दिसली.
परतीच्या वाटेवर असलेला पंत सचिवांचा चौसोपी वाडा अजूनही छान स्थितीत आहे. मोठ मोठी कोठारे, किल्ल्याचे भग्नावस्थेतील अवशेष, लांबच लांब तटबंदी अजूनही किल्ल्याच्या भव्यतेची जाणीव करून देतात.
सुंदर गोष्ट सहजासहजी मिळत नाही असं म्हणतात.
मोजक्या शब्दात सांगायचे झाले तर सौंदर्यानं नटलेला पण आपल्या संयमाची खरी परीक्षा घेणारा किल्ले सुधागड फत्ते.
- नम्रता बर्वे
६ ऑगस्ट २०१८