शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला कोथळीगड नावाने जरी बलाढ्य वाटत असला तरी तसा छोटासाच किल्ला. सुळख्याच्या आतल्या बाजूला कातळात कोरलेल्या पायऱ्या म्हणजे अभियंत्याच्या उत्कृष्ठ कलेचा एक नमुनाच जणू. पण सुळख्यापर्यंत पोहोचण्यासाठी कराव्या लागणाऱ्या 3000 फुटी पायपिटीला पर्याय नाही. पायथ्याशी असलेल्या पेठ गावाच्या निकटतेमुळे किल्ल्याला पेठ चा किल्ला असं नाव पडलं. कर्जतमार्गे खेड कडे जाणाऱ्या कोलिंबा आणि सावळ घाटांवरील देखरेखीसाठी आणि मुख्यतः शस्त्रसाठा ठेवण्यासाठी किल्ल्याचा वापर होत असे.
तर झालं असं की मित्रपरिवार, सहकारी यांच्या तोंडून कोथळीगडाबद्दल फार ऐकलं होतं. चहूबाजूंना दाट झाडी, नजर जाईल तिकडे हिरवळ, क्षणागणिक कुस बदलणारा पाऊस, धुक्याआड लपलेला गडाचा सुळखा आणि गडाच्या कड्यावरून कोसळणारे सात धबधबे असं मनमोहक चित्र डोक्यात तयार झालं होतं. यावेळेस स्वतः हे सगळं अनुभवायचं म्हणून कोथळीगड सर करायचं ठरवलं.
ग्रीष्म सरून बराच अवधी गेला पण पावसाची काही चिन्ह नाहीत त्यामुळे गड सर करताना अगदी धो धो नाही पण रिमझिम सरींची तरी सोबत होईल अशी अपेक्षा होती. पण घडलं काहीतरी वेगळंच. कडकडीत उन्हात 28 जणांचं टोळकं निघालं कर्जत च्या दिशेने. वाटेत मध्येच बस बंद पडली आणि वेळेचं गणितही बारगळलंच.
पाऊस नाही, वारा नाही आणि रणरणत्या उन्हात वेळेपेक्षा साधारण दीड तास उशिराने ट्रेक सुरु झाला.
मग काय,
दाट झाडीची जागा घेतली पानगळती झालेल्या फांद्यांनी
नजर जाईल तिकडे फक्त माती
क्षणागणिक कुस बदलणारा आणि उन्हाची तीव्रता वाढवणारा सूर्य
आणि
माझाच उन्हाशी चाललेला लपंडाव.
सगळं सोबत घेऊन 3000 फुटांची उंची गाठली.
वाट म्हटलं तर सोपी आणि म्हटलं तर अवघड. सुरुवातीला कच्ची पण चढ असलेली पायवाट, मग डोंगर फोडून तयार केलेला खडकाळ रस्ता आणि शेवटी कातळात कोरलेल्या दीड-दोन फुटी पायऱ्या अश्या तीन टप्प्याचा सगळा प्रवास आणि तो पार करायचा अट्टाहास फक्त जिद्दीपोटी पूर्ण करता आला.
साधारण 2 तासांच्या ट्रेक दरम्यान किमान 6-7 ग्लास लिंबूपाणी गट्टम केल्यावर हायसं वाटायचं...अर्थात तो क्षणिक दिलासा होता हे ही प्रत्येक ग्लास संपल्यावर कळायचंच.
कोथळीगड सर करतानाचा माझा अनुभव जरी इतरांपेक्षा वेगळा असला तरी त्याचीही आपली एक गोडी होती, मज्जा होती, त्यातही आनंद होताच.
अजून एक गोष्ट आवर्जून लिहावीशी वाटते ती म्हणजे गडावरच्या तोफांचे केलेले संवर्धन. किल्ल्यावरच्या तोफेला लाकडी तोफगाडा बसवण्यात आलाय ही नक्कीच कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल.
एकंदर काय ट्रेक संपता संपता पाउसाऐवजी घामाने भिजून परत आले आणि किल्ले कोथळीगड फत्ते झाला. 🚩 #latepost
- नम्रता बर्वे
23 जुलै 2019