“मला माझ्या मनासारखं जगायचं आहे”. अस प्रत्येकाला वाटत. पण नेमक कस? या प्रश्नाचं उत्तर कधी कधी सगळं करून देखील अनुत्तरीतच राहत. आपण एखादी कृती का केली पाहिजे या प्रश्नाचं उत्तर शोधली कि सगळं शक्य आहे अस मला वाटत. थोडक्यात काय - आवड असेल तर सवड मिळते. 'मी या जगात आले आहे तर हे जग बघूनच जाईल' असं ठरवलं आहे. म्हणूनच मी खूप फिरते. मला आवडतात हे स्वछंदी प्रवासानुभव ! कधी न संपणारे ! ते देखील माझ्या कुटुंबासोबत. एक स्त्री म्हणून सगळं म्हणजे घर,संसार,नोकरी आणि मूल सांभाळून फिरणं माझ्यासाठी खूप आव्हात्मक आहे खरं पण शिस्त,कुतूहल आणि आवड यांचे समीकरण नीट जुळून आलं कि जमतंय बघा सगळं.
२०१८ डिसेंबर मध्ये स्वानंदीला घेऊन प्रथमतः मी लोहगड किल्ला सर करण्याचा प्रयत्न केला आणि योगायोगाने तो यशस्वी देखील झाला. या पहिल्या प्रवासाने मला हिम्मत मिळाली. यातूनच नंतर जानेवारीमध्ये रायरेश्वर सर केला आणि २०१९ चे ध्येय मिळालं. ते म्हणजे दर महिन्याला एका तरी किल्याला किंवा एखाद्या महाराष्ट्रातील अभयारण्याला, समुद्र किनाऱ्याला किंवा डोंगराच्या कुशीत लपलेल्या एखाद्या टुमदार रिसॉर्टला भेट द्यायची.त्यानंतर तुंग,तिकोना या सारख्या पुण्याच्या आसपासच्या किल्यांच्या भेटी वाढल्या आणि पुढचा प्रवास सुरु झाला.
भटकायचं वेड लहानपणापासूनच कदाचित वडिलांकडून आलेली देणगी. वडिलांमुळे संपूर्ण दक्षिण भारतांतील शहरे रामेश्वर,कन्याकुमारी,तिरुपती,बेंगलोर,चेन्नई, केरळ,हैद्राबाद आणि आणखी कितीतरी शहरे फिरून झाली. आता हा फिरण्याचा वारसा मी पुढे चालवत आहे माझ्या मुली सोबत.
नोकरी, संसार,मूल आणि स्वतःची तब्येत फिरण्यासाठी योग्य व्यवस्थापन लागत हे प्रवासातील अनेक अनुभवाने शिकवलं अर्थात माझे पती आदिनाथ याची पदोपदी मला साथ असतेच. स्वानंदी आयुष्यात येण्या आधी आम्ही दोघे वर्षातून २ वेळा म्हणजे दर सहा महिन्यांनी अगदी न चुकता संपूर्ण १ ते दीड आठवड्याची सुट्टी घेऊन दांडेली,चिंचणी ,औरंगाबाद,हंपी,केरळ, सिमला,चंदिगड,दिल्ली,मनाली, (अनेकदा) गोवा, कोकणातील समुद्र किनारे यांसारखी अनेक ठिकाणे पादाक्रांत केली.या सोबत अधून मधून पुण्याच्या आजुबाजुंला फिरायचो ते वेगळच.
बाळ झाल्यावर आम्हा भटक्यांचं ३६० डिग्री मधलं आयुष्य एकदम ९० डिग्री च्या काटकोनासारखं झालं मूल,नोकरी आणि घर बस्स!! या तुन बाहेर येण्यासाठी मुलीला घेऊन सर्व प्रथम अक्कलकोटच्या स्वामी समर्थाना लोटांगण घातलं आणि आशीर्वाद घेतला.त्यानंतर स्वानंदी ५ महिन्याची असल्यापासूनच तिला सोबत घेऊन आम्ही फिरायला लागलो. सगळ्यात आधी आमच्या लग्नाच्या सातव्या वाढदिसानिमित्तानी भोरला कॅम्पिसाठी नेलं.
तिथला आमचा अनुभव आणि तिचा प्रतिसाद खूपच चांगला होता. तिच्या एकंदर प्रवासातील प्रतिसादाने तिला देखील निसर्ग आवडतो हे निश्चित झालं. यातूनच पुढे पुण्याच्या जवळपास आम्ही तिला घेऊन जायला लागलो.
ती ज्या दिवशी १ वर्षांची झाली त्याच्या अगदीच दुसऱ्याच दिवशी राजस्थान गाठलं आणि पुण्याची सीमा ओलांडली! नंतर मग पुढे गोवा आणि तळ कोकणही गाठलं.
त्यानंतर आम्हाला असं जाणवलं कि शनिवार- रविवारी एखाद्या ट्रेकला किंवा कुठे फिरायला जायचं झालाच तर एकतर मला नाहीतर आदिनाथला कोणाला तरी बाळा जवळ थांबव लागायचं कारण तिला कडेवर उचलून ४-६ तास घेऊन फिरणं म्हणजे खरंच कठीण होत तिच्यासाठी आणि आमच्यासाठी देखील. यावर उपाय शोधण भागच होत. तिच्यासाठी आरामदायी असं बेबी कॅरिअर शोधणं फारच महत्वाचं होत आणि अखेर मला ते सापडलं. एक तोळा सोन्याचा दागिना कि बेबी कॅरिअर हा प्रश्न समोर होता….आणि त्याला मी योग्य न्याय दिला.. भलीमोठी किंमत मोजून शेवटी मी ते विकत घेतलं आणि आमचा प्रश्न सुटला. आता आम्ही खऱ्या अर्थाने स्वछंदी झालो … कुठेही, कधीही फिरणारे ३ इडियट्स झालो !!!बेबी कॅरिअर आल्यावर त्याची चाचणी (trial) घेण्यासाठी नोव्हेंबरमध्ये जवळचा किल्ला गाठला - तो म्हणजे लोहगड. लोहगडाचा प्रवास माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.
आपण जिथे जन्माला आलो,जिथे आपलं आयुष्य जाणार आहे त्या मातीची ,प्रदेशाची ओळख,त्याचा इतिहास यांची ओळख आपल्या भावी पिढीला करून देणं हे एक पालक म्हणून आमचं कर्तव्य आहे असं मला वाटत. म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं कि या वर्षी (२०१९) दरमहा एक किल्ला करायचा. स्वानंदीला शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने आत्तापासूनच ओळख करून द्यायची मग भले आपल्याला जरासा त्रास झाला तरी चालेल. कदाचित यातूनच एखादा मावळा महाराष्ट्राला लाभेल. साधारण १५ किलो वजन पाठीला घेऊन किल्ले चढण्यात माझा कस निघतो खरा पण म्हणतात ना - इच्छा तेथे मार्ग ! आणि " प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट" या मुळे आता सगळं सोपं वाटत.
आमच्या या २ वर्षांच्या मुलीला सध्या तरी चार-पाच किल्यांची नाव ज्याला आम्ही भेटी दिल्या आहेत ती अगदी नीट सांगता येतात आणि हे किल्ले शिवाजी महाराजांचे आहेत हे देखील ती सांगते .. एक पालक म्हणून आम्हाला या पेक्षा अजून मोठा आनंद तो काय! याचा अर्थ प्रत्यक्ष किल्यांवर गेल्यावरच तो गड,किल्ला किंवा एखादं ठिकाण पक्क लक्षात राहत याच हे उत्तम उदाहरण. शेवटी काय- "पेरावे तसे उगवते"!
स्वानंदीसोबत पुढचा प्रवास आणि त्या प्रवासातील संभाव्य अडचणी काय असू शकतील याचा अभ्यास करण्यासाठी आणि माहीती मिळवण्यासाठी आम्ही अनेक पुस्तके वाचायला सुरुवात केली. चेतन बढे या पुस्तकी किड्याने मला उत्तम वाचनीय साहित्य मिळवून देण्यास खूप मदत केली.या साहित्यामुळे संपूर्ण वर्षभराचं नियोजन आखण्यास भरपूर मदत झाली. एखाद्या किल्याला जायचं असेल किल्यावरील वातावरण,पाण्याची सोय, तिथला परिसर,पोटापाण्याची सोय , उपलब्ध वाहतुकीची साधने आणि जवळपास राहण्याची ठिकाणे या सारख्या मूलभूत गोष्टी आणि गरजांचा अभ्यास करता येतो.सोबत लहान मूल असेल तर अगदी कटाक्षाने याचा विचार कारालाच पाहिजे कि जेणे करून प्रवास सुखकारक होईल,बाळाला देखील त्रास होणार नाही आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्येपण ही वेळेवर रुजू होता येईल.
आमचा प्रवास आणि प्रवासातील बरे वाईट अनुभव मी माझ्या डायरीत लिहीत असे आणि लिहून झाल्यावर ती डायरी उशीखाली पडून राहायची.आदिनाथने जेव्हा माझं लिखाण वाचलं तेव्हा हे अनुभव ब्लॉगच्या माध्यमातून जगासोबत शेअर करण्यासाठी त्याने मला उस्फुर्त केलं आणि यातूनच - स्वच्छंदी! न संपणारे प्रवासानुभव!! या माझ्या मराठी ब्लॉगची सुरुवात झाली.https://swacchandie.blogspot.com/ २०१५ पासून मी हा ब्लॉग लिहित आहे आणि माझ्या बंद डायरीतील प्रवासानुभव अनेक वाचकांपर्यंत पोहचवत आहे.
माझे लिखाण आणि त्यातील माहिती ही जास्त करून पालकांसाठी असते कि जेणे करून लहान मुलांसोबत गड-किल्ले चढण शक्य आहे हे त्यांना पटेल आणि सोईस्करदेखील वाटेल. मला सांगायला अत्यंत आनंद होतो कि माझ्या अनेक शाळेतील मित्र मैत्रीणीनी, ओळखीतल्या लोकांनी माझे लेख वाचून मुलांसोबत किल्याना भेटी द्यायला चालू केलं आहे. अनेक माझ्या मैत्रिणींना मी एक प्रेरणा देणारा स्रोत वाटत आहे कि नोकरी,घर-दार,मुलं हे सगळं सांभाळून मी किल्ले चढत आहेत. माझ्या ब्लॉग्स मुळे अनेक लहान -थोरांचे आशीर्वाद आणि शुभेच्यांचा वर्षाव देखील माझ्यावर होत आहे. याच शुभेच्या आणि आशीर्वाद मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहेत. या प्रवासात माझे पती आदिनाथ,माझी बहीण मोनिका आणि माझा मित्र चेतन यांचा देखील खूप मोलाचा वाटा आहे. त्याच सोबत माझे अनेक वाचक आणि शुभचिंतक देखील!
तर वाचकांनो आणि खास करून मातांनो -किल्ले फिरा आणि भावी पिढीला महाराष्ट्र दाखवा.