खूप दिवसांपासून मला स्वानंदीला किल्ला दाखवायला न्यायचं होतं. तिला देखील महाराष्ट्रातील गड ,किल्ले,वास्तू आणि महाराष्ट्राचा इतिहास याची ओळख व्हावी हीच अपेक्षा. या निमित्ताने कोणता किल्ला निवडावा म्हणजे तिला आवडेल आणि आपल्याला पण किल्ला चढताना त्रास होणार नाही या सारख्या अनेक प्रश्नांनी मला आणि आदिनाथला वेड लावलं होतं. पण म्हणतात ना "इच्छा तेथे मार्ग"!! आणि हो या सगळ्या प्रश्नातून मार्ग काढत आम्ही पुण्यापासून जवळलंच असलेल्या "लोहगडची" निवड केली. (सिंहगड आणि शनिरवारवाड्यापेक्षा वेगळा किल्ला म्हणून हा निवडला )
सकाळी ७ वाजता आम्ही घर सोडलं. लवकर निघाल्यामुळे रस्त्याला अजिबात गर्दी नव्हती त्यामुळे अगदी दीड तासात आम्ही गड्याच्या पायथ्याशी येऊन पोहचलो. पायथ्याशी २-३ हॉटेल्स आहेत तिथे नाष्ट्याची सोय झाली. माझ्या मुलीला (स्वानंदीला) झोपेत उचलूनच गाडीत घेतल होत त्यामुळे पायथ्याशी पोहचेपर्यंत तिचीही झोप छान पूर्ण झाली होती. तिला खायला घालून आम्ही गड चढायला सुरुवात केली.
हा गिरिदुर्ग साधारण १००० मीटर पेक्षा जास्त उंचीवर आहे. हा किल्ला उंच आहे पण अवघड नाही. सुस्थितीत असलेल्या पायऱ्यांमुळे गडाची वाट सोपी झाली आहे. म्हणजे बघा अगदी ५-६ वर्षांची मुले देखील हा किल्ला आरामात सर करतात. पुण्यापासून जवळ, सोपी चढण,मजबूत बांधकाम, लांबलचक तटबंदी आणि विस्तृत पठार अशी काही या किल्ल्याची वैशिष्ट्य मला आढळली.
किल्यावर ठिकठिकाणी प्रत्येक जागेची माहिती आणि फलक (बोर्ड) लावले आहेत त्यामुळे इथे गाईडची अवश्यकता भासत नाही.
साधारण ६०-७० पायऱ्या चढून आम्ही सर्वप्रथम आम्ही "गणेश दरवाजात"पोहचलो. आपण इथंपर्यंत स्वानंदीला घेऊन आलो यावर माझा विश्वासच बसत नव्हता. स्वानंदीला माझ्या पाठीवरचं "गव्हाचं पोत" म्हणून मिरवायला खूप आवडतं आणि या संधीचा फायदा घेऊन आम्ही तिला संपूर्ण किल्ला फिरवत होतो. अशा प्रकारे किल्ला दर्शन या मोहिमेचा "श्री गणेशा" गणेश दरवाजात प्रवेश करताच झाला.
या प्रवेशव्दाराच्या दोनही बाजूला गणपतीचे चित्र कोरलेले आहे म्हणूनच याला गणेश दरवाजा अस म्हणतात. याच ठिकाणी सावळे कुटुंबीयांचा नरबळी देण्यात आला आणि त्या बदल्यात पुढे याच गावाची पाटीलकी त्यांच्या वंशजांना देण्यात आली असे इतिहासकार म्हणतात.
आम्ही पुढे नारायण दरवाजा आणि हनुमान दरवाजाकडे निघालो .
बऱ्यापैकी आकाराने मोठ्या असलेल्या हनुमान दरवाजावर दगडातील कोरीवकाम उठून दिसत होतं. या ही दरवाजाच्या दोनही बाजूला मारुतीचे चित्र कोरले आहे. रेखीव कमान आणि मजबूत दरवाजा अशी काही या दरवाजाची वैशिट्ये पाहायला मिळाली.
आमच्या सोबत स्वानंदी सुद्धा चिमुकल्या पावलांनी किल्ला चढत होती आणि तिचा जोश पाहून आम्हालाही आनंद होत होता.
पुढे किल्याचा पायऱ्या संपल्या आणि किल्याचा पठारी भाग चालू झाला. मध्यभागी किल्यावर पोहचल्यावर समोरच आपल्याला कबर,तोफा आणि शंकराचं मंदिर दिसते ते बघून आम्ही इथेच जरा विसावा घेतला.
इथपर्यंत वाटेमध्ये काहीही खायला विकत मिळत नाही (पायथ्याला सोय आहे) त्यामुळे आपल्या पोटापाण्याची सोय घरूनच घेऊन यावी. सोबत लहान मुले असतील तर संत्र, लिंबूसरबत ,ग्लुकाँडी, केळी सोबत असलेली चांगलं.
पुढच्या प्रवासात किल्यावर कुठेही विसाव्याची अशी जागा सापडली नाही. मोकळा , विस्तृत भूभाग आणि त्यावर वाढलेली पिवळी झालेली खुरटी गवत देखील गडाच्या सौंदर्यात भर घालत होती. स्वानंदीला घेऊन माझी बऱ्यापैकी दमछाक झाली हाती त्यामुळे तिचा भार मोनिकाला (माझ्या बहिणीला) आणि नंतर आदिनाथला सांभाळावा लागला. थंडीमधल्या सकाळच्या ११ वाजता देखील या माळरानावर उन्हाची तीव्रता जाणवत होती.
किल्यावर नकाशात दाखवल्याप्रमाणे तीन तळी आहेत . त्यापैकी १६ कोनी तलाव बघण्यासारखा आहे.
हा तलाव बराच मोठा असून यात उताऱ्यासाठी पायऱ्यांची सोय आहे .आम्ही आणि स्वानंदीने सुद्धा जरा वेळ या तलावात उतरून थंड पाण्याचा आनंद लुटला.
हे तळ म्हणजे "ग्रुप"फोटोसाठी या किल्यावरील उत्तम ठिकाण आहे अस आपण म्हणू शकतो. ग्रुपनी येणारे सगळेच जण या तलावाच्या पायर्यांवर बसून फोटो काढल्या शिवाय पुढे जात नव्हते.
तळ्याच्या गार पाण्यात उड्या मारून आम्ही पुढे किल्याच्या शेवटच्या टप्प्याकडे निघालो ते म्हणजे "विंचूकाटा"!
विंचवाच्या नांगी प्रमाणे भासणाऱ्या या डोंगरकड्या कडे जाण्याची वाट जरा किचकटच आहे.माझ्या सोबत माझे वडील देखील या ट्रेकला होते त्यामुळे लहान मुले आणि वडीलधारी माणसं सोबत असतील तर या वाटेतून जाताना जरा जपूनच पुढे जाव.
विंचूकाट्याकडे जाताना आणि परत येतानाचा रस्ता खडकाळ दगडी मार्गातून होता. स्वानंदीला पाठीवर घेऊन या उतारावरून चालताना काहीस कठीण वाटलं (challenging ) पण आदिनाथने अगदी सावकाशपणे स्वतःला आणि स्वानंदीला सावरत हि वाट पार करून घेतली. या वाटेनंतर मात्र पुढचा रस्ता अगदी सरळ आणि सोपा आहे जो आपल्याला थेट कड्यापर्यंत नेतो.
या कड्यावरून लोणावळ्याच्या आजूबाजूचे बाकीचे किल्ले अगदी सहज नजरेस पडतात. उजव्या बाजूला "विसापूर"चा किल्ला,डाव्या बाजूला तुंग,तिकोना आणि पवन धरण !!
स्वानंदीला घेऊन विंचूकाट्याला पोहचल्यावर मला गड जिंकल्यासारखा आनंद झाला. अर्थातच यात माझ्या बहिणीची आणि वडिलांची देखील खूप मदत झाली.
स्वानंदीला सोबत घेऊन हा किल्ला सर करणे म्हणजे माझ्यासाठी पुढच्या प्रवासाची दारं खुली झाल्या सारखी आहेत. "लोहगडला" माझा मानाचा मुजरा!! कारण या किल्यांची मला आत्मविश्वास दिला कि आता आम्ही स्वानंदीला घेऊन अजून अनेक किल्यांना निर्धास्तपणे भेटी देऊ शकतो.
कसे जाल - पुण्यापासून ६५ किलोमीटरवर मळवली स्टेशन. रेल्वे स्टेशन ओलांडून किल्याकडे जाण्याचा रस्ता चालू होतो. जर रेल्वेने आलात तर मळवली स्टेशन ला उतरून चालत (२-३ किलोमीटर) जावे लागते. सोबत लहान मुले असतील तर कार घेऊन जाणे उत्तम. मळवली स्टेशनजवळ अनेक ठिकाणी कार भाड्याने मिळते.
किल्ला पाहायला लागणार वेळ - ५-६ तास (७-८ किलोमीटर येऊन जाऊन )
जेवणाची/ राहण्याची सोय - पायथ्याशी अनेक लहान हॉटेल्स आहेत. पण किल्ला चढताना वाटेत काहीही विकत मिळत नाही त्यामुळे खायचे थोडेफार आणि पाणी सोबत असावे.
कोरड्या हवेमुळे घश्याला कोरड पडते त्यामुळे संपूर्ण ट्रेकमध्ये शरीरात ३-४ लिटर पाणी जाणं गरजेचं आहे अन्यथा दुसऱ्या दिवशी खूप थकवा येऊ शकतो. किल्यावर झाडे आणि आडोसे कमी असल्यामुळे सोबत गॉगल आणि टोपी बाळगणे जरुरीचे आहे
पार्किंगची सोय - आहे पण लवकर गेलात तर किल्या जवळ पार्किंगला जागा मिळेल नाहीतर खूप लांबपर्यंत गाडी पार्किंग करायला जावं लागत. (५० रुपये कार ,२०-३० रुपये दुचाकी)
तुम्हाला माझी पोस्ट आवडली असेल तर नक्की फेसबुक,व्हाट्सअप,गुगल अकाउंटवर शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया देखील कळवा.