२०१९ नक्कीच जबरदस्त अनुभवांचं आणि कार्यपुर्तीच जाणार असा मला एकंदर वाटतं आहे. २०१९ मधला हा माझा पहिला ब्लॉग. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मी भरपूर फिरणार आहे आणि अनेक ठिकाणं, किल्ले यांना भेटी देणार आहे ते देखील "स्वानंदी" सोबत. माझ्या प्रवासातील सगळ्या गमती जमती, चांगले- वाईट अनुभव तुमच्या पर्यंत मी या ब्लॉग द्वारे आणि यु ट्यूब व्हिडिओ द्वारे घेऊन येणार आहे.
स्वानंदीला घेऊन भटकायचं म्हणजे बऱ्याच लहान मोठ्या गोष्टींचा विचार करून एखाद ठिकाण निवडाव लागत. या वर्षी निवडलेली सगळी ठिकाण पुण्याच्या ६०-७० किलोमीटरच्या परिसरातील आहेत. ठिकाणांची अशी यादी तयार केली आहे कि जेणेकरून घरी लवकर परत येता येईल आणि सोमवारी ऑफिसला जायला त्रास हि होणार नाही. २०१९ च्या भटकंतीची सुरुवात अशाच पुण्याजवळच्या ठिकाणापासून केली आहे .
आपण कितीही आधुनिक झालो असलो तरी आजही एखाद्या नवीन उपक्रमाची, कार्यक्रमाची सुरुवात ही देव-दर्शनानेचकरतो. मला देखील २०१९ च्या प्रवासाची सुरुवात अशाच एखाद्या ठिकाणापासून करायची होती जे आम्हाला वर्षभर प्रेरणा देत राहील. याच विचारात असतानाच स्वराज्य स्थापनेचा साक्षीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवलायची आठवण झाली - ते म्हणजे " रायरेश्वर".
ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी ७ ला पुण्याहुन निघालो आणि भोर गाठले. स्वानंदीला झोपेतूनच उचललं आणि गाडीत घेतलं. भोरमध्ये नाश्ता- पाणी करून रायरेश्वराचा रस्ता पकडला. भोर पासून साधारण एका तासाच्या अंतरावर रायरेश्वरचा डोंगर आहे. रायरेश्वराकडे जाताना केंजळगड आपल्याला खुनावत असतो. रायरेश्वरापेक्षा केंजळगडाकडे जावस वाटत. त्याची उंची तटबंदी आपल्याला शेवटपर्यंत साद घालत राहते.
एक दिवस रायरेश्वर पठारावर राहून दुसऱ्या दिवशी केंजळगड जरी केला तरी फारस थकल्या सारखं वाटणार नाही आणि डोंगरावर, निसर्गाच्या सानिध्यात राहायची मजा देखील लुटता येईल. (सोबत लहान मुले असतील तर २ दिवसाचा प्लॅन करावा, एकाच दिवशी दोन्ही ठिकाणांना भेटी देणं शक्य होणार नाही).
१०.३० च्या सुमारास आम्ही रायरेश्वराच्या पायथ्याशी पोहचलो. निरभ्र आकाशाला गवसणी घालणारा डोंगर कधी एकदा चढायला सुरुवात करतीये असं वाटत होतं. गाडी पार्क केली आणि पायथ्याला असणाऱ्या टपरीवर भजी आणि चहाचा आनंद लुटला. सकाळच्या थंडीत अशी गरमागरम, कुरकुरीत भज्जी आणि चहा म्हणजे ....... तुम्हीच समजून घ्या आता काय ते !!!
लहान मुलं सोबत असतील तर त्यांच्या मूड नुसार सगळं जमून यायला वेळ लागतो याचा प्रत्यय मला इथे देखील आला. स्वानंदीची गाडी रुळावर यायला जरा अर्धा तास वेळ गेला. सगळं उरकून आम्ही ११ च्या सुमारास डोंगर चढायला सुरुवात केली.
प्रथम दर्शनी दिसणारा टोलेजंग असा रायरेश्वराचा डोंगर चढता येईल का? अशी शंका मनांत डोकावली खरी,कारण पायथ्याकडून डोंगराकडे वर पाहिलं तर ना पायऱ्या दिसत होत्या ना पायवाट त्यामुळे अशी शंका मनात येणे स्वाभाविक होतं. फार विचार न करता आम्ही डोंगराच्या दिशेने चालायला सुरुवात केली .जसजस पुढे जायला लागलो तसतसं सगळ्या शंका दूर होत गेल्या. डोंगरावर चढण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या आहेत. दुर्ग प्रेमींनी बांधलेल्या लोखंडी जिन्यामुळे चढणीची वाट आणखीनच सुकर होते. हा एकच टप्पा काळजीपूर्वक चढला तर पुढचा सबंध प्रवास सपाट पठारावरूनच आहे त्यामुळे लहान मुले सोबत असतील तर काळजी करण्यासारखं असं काही नाही आहे .
या डोंगरावरून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि वळ्णावळणांच्या रस्त्याचे विहंगम दृश्य मी कधीच विसरू शकत नाही. हा परिसर पावसाळ्यातील हिरवळीने आणखीनच खुलून जात असेल यात काही शंकाच नाही
डोंगर चढून वर आल्याबरोबरच पठार चालू होते आणि मंदिराच्याकडे घेऊन जाणारा पक्का रस्ता सुरु होतो. या पक्क्या वाटेमुळे वाट चुकणे, कुठेतरी भरकटणे या सारखे प्रसंग येण्याची शक्यता खुप कमी आहेत.त्यामुळे लहान मुले सोबत असतील तर मस्त त्यांना चालु द्यावं इकडे तिकडे भटकूही द्यावं कारण इथून पुढेचा रस्ता खूप सुरक्षित आहे.
मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर आम्हाला एक कुंड लागलं - "गोमुख कुंड". या कुंडात पडणारे झऱ्याचे स्वच्छ पाणी बघूनच प्यायची इच्छा होते. घनदाट झाडाच्या सावलीत बसून आम्ही देखील या कुंडातील पाणी प्यायलो. असं हे थंड, मधूर आणि निर्मल पाणी दुपारी बाराच्या सुमारास प्यायला मिळणं म्हणजे अमृतसमानच!
२०-२५ मिनिटे चालल्यावर आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात पोहचलो. हे पांडवकालीन मंदिर लहान तरीही अत्यंत रेखीव आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील शांतता थकलेल्या देहाला प्रफुल्लित करते. काळ्या कातळात उभ असलेल हे लहान मंदिर, महाराष्ट्रमधे घडलेल्या महान इतिहासाच साक्षीदार आहे.
याच शिवलिंगावर शिवाजी महाराजांनी करंगळी कापून रक्ताचा अभिषेक केला आणि या इथेच स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिवाजी महाराज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणी मला जायला मिळालं हे माझं भाग्यच समजते.
दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडायला आम्हाला दुपारचे १.३० वाजले. पोटात कावळे ओरडायला चालू झालच होत. आम्ही मंदिराच्या वरच्या दिशेने चालायला सुरुवात केली. सगळीकडे टवकारलेल्या गव्हाच्या ओंब्या वाऱ्यावर डुलत होत्या.या पठारावर गहू, नाचणी मोठ्या प्रमाणावर तर टोमॅटो, वांगी यासारख्या फळभाज्या लहान प्रमाणावर पिकवल्या जातात.या शेतीची खासियत म्हणजे इथल्या पिकांना पाणी द्यावं लागत नाही, जमिनीतून मिळालेल्या पाण्यावर ही पीक निसर्गाच्या सानिध्यात आपोआपच बहरतात. म्हणजे काय निसर्ग सगळ्यांची काळजी उत्तम प्रकारे घेतो त्याच हे उत्तम उदाहरण!
इतक्या उंच पठारावर आजही इथे ५०-५५ कुटुंब राहतात. रायरेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांची जेवणाची सोय याच घरांमध्ये होते. इथले स्थानिक पापड, लोणचे, मीठ ,मसाला, भाज्या आणि इतर साहित्य वाईच्या आठवडे बाजारातून खरेदी करतात. हे सगळं सामान डोंगराच्या अवघड वाटेने वाहून वर आणतात आणि त्यातूनच आपल्यासाठीची जेवणाची सोय करतात. ही फारच कौतुकाची बाब आहे.
आमच्या दुपारच्या जेवणाची सोय जंगम काकांच्या घरी होती. मातीच शेणानी सारवलं घर आणि मोठ्ठ अंगण लाभलेल्या शेतातील घरात जेवायची मज्जा काही औरच होती. गरमागरम पिठलं, नाचणी आणि ज्वारीची भाकरी, झणझणीत ठेचा, खेकडा भजी आणि गोड कांदा... हे बघून तर आम्ही जेवणावर तुटूनच पडलो.
जेवणानंतर नको असलेलं सामान काकांच्या घरी ठेऊन आम्ही पुढे आजूबाजूचा परिसर पाहायला निघालो."सप्तरंगी वाळूची खाण" हे इथलं खास आकर्षण. या ठिकाणी वेगवेगळ्या सात रंगांची माती पाहायला मिळते. इथं पर्यंत पोहचण्याचा मार्ग शेतातून आणि झाड झुडपातून जातो. जस जस आम्ही पुढे जात होतो तस पठारावरचं हिरव्या-पिवळ्या रंगाच सौदर्य आणखीनच खुलून दिसत होत. त्याचप्रमाणे दूरवर पसरलेली पर्वत रांग आणि त्यात उंच मानेने उभे असलेले आजूबाजूचे कमळगड, केंजळगड, विचित्रगड यासारखे किल्ले जास्तच मोहक वाटत होते.
एकंदर बरीच चढण चढून गेल्यावर आम्ही सप्तरंगी मातीच्या खाणीजवळ पोहचलो. बोर्डावर लिहल्याप्रमाणेच
मातीच्या या अनेक रंगांचे नमुने पाहून आम्ही देखील थक्क झालो.
निसर्गाचा हा अविष्कार पाहून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. जंगम काकांकडे परत पोहचेपर्यंत आम्हाला ४.३० वाजले. ४.३० म्हणजे आपली चहाची वेळ! त्यामुळे मस्तपैकी फक्कड चहा घेऊन आणि जरा विश्रांती घेऊन डोंगर उतरायला सुरुवात केली.
माझी बहीण मोनिका,चेतन आणि आदीनाथ यांच्या मदतीमुळे स्वानंदीला अशा ठिकाणी घेऊन जाण मला शक्य झालं. मराठी साम्राज्याचा साक्षीदार असलेल्या या रायरेश्वराने मलादेखील पुढील वाटचालीसाठी बळ द्यावे हीच प्रार्थना. हर ह र महादेव !!!!
कधी जावं - उत्तम काळ- पावसाळा (लहान मुलांना पावसाळ्यात घेऊन डोंगर चढणे अवघड आहे) त्यामुळे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्ये प्लॅन करू शकता.
कसे जाल - पुण्यापासून- भोर, भोर पासून २५ किलोमीटरवर कोर्ले गाव. या गावातूनच पुढे जाणारा रस्ता पकडावा. राज्य परिवहन मंडळाची बस भोर ते कोर्ले चालू असते. सोबत लहान मुले असतील तर कार घेऊन जाणे उत्तम.
रायरेश्वर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पाहायला लागणार वेळ - ५-६ तास (१० किलोमीटर येऊन जाऊन )
जेवणाची/ राहण्याची सोय - डोंगर चढून पठारावर तंबू ठोकून राहू शकता किंवा तेथील रहिवासांच्या घरी देखील ६००-७०० रुपयात उत्तम राहायची, जेवणाची सोय आहे. आजूबाजूला हॉटेल नाहीत.
सोबत काय घ्यावे - थंडीत खूप गार वारे वाहतात त्यामुळे सोबत गरम कपडे बाळगावे. कोकण किनार पट्टी जवळ असल्याकारणाने घाम ही येतो. त्यामुळे १-२ लिटर पाणी,गॉगल आणि टोपी बाळगणे गरजेचे आहे . पठारावर गोमुख कुंडातील पाणी स्वच्छ आहे त्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका न आणता प्यायला काहीही हरकत नाही.
पार्किंगची सोय - डोंगराच्या पायथ्याशी भरपूर जागा आहे पण झाडे २-३ च आहेत त्यामुळे पण लवकर गेलात तर झाडाखाली गाडी लावता येऊ शकते.
तसेच माझ्या YouTube चॅनेल स्वच्छंदी ला पण आवश्यक भेट द्या रायरेश्वरच्या प्रवासाचा व्हिडीओ बघा,लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया देखील नोंदवा आणि subscribe देखील करा.
https://www.youtube.com/channel/UCSoX8z-RMaQu6ZqNkuKJIww
तुम्हाला माझी ही पोस्ट आवडली असेल तर फेसबुक, व्हाट्सअप, गुगल अकाउंटवर प्रतिक्रिया द्या, आपल्या परिवारासोबत शेअर करा आणि ई-मेल आयडी नोंदवून सब क्राइब करायला विसरू नका.