मिशन २०१९ - किल्ला २ - तिकोना म्हणजे - वितंडगड

Tripoto
7th Apr 2019

२०१८ डिसेंबर मध्ये स्वानंदीला घेऊन प्रथमतः मी लोहगड किल्ला सर करण्याचा प्रयत्न केला आणि योगायोगाने तो यशस्वी देखील झाला. या पहिल्या प्रवासाने मला हिम्मत मिळाली. यातूनच नंतर जानेवारीमध्ये रायरेश्वर सर केला आणि २०१९ चे ध्येय मिळालं. ते म्हणजे दर महिन्याला एका तरी किल्याला किंवा एखाद्या महाराष्ट्रातील अभयारण्याला, समुद्र किनाऱ्याला किंवा डोंगराच्या कुशीत लपलेल्या एखाद्या टुमदार रिसॉर्टला भेट द्यायची. अर्थात जिथे शक्य असेल तिथे स्वानंदीही असेलच माझ्या सोबत.अशा या उपक्रमाचं पुढचं पाऊल म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सर केलेला तिकोना किल्ला म्हणजेच -"वितंडगड "!

Photo of मिशन २०१९ - किल्ला २ - तिकोना म्हणजे - वितंडगड 1/4 by Snehal Gherade

तो फेब्रुवारी महिन्यातील शेवटचा आठवडा होता. ऊन वाढत असल्यामुळे मी पुण्याजवळच्याच तिकोना किल्याची निवड केली. त्याच कारण असं कि हा किल्ला उंचावर आहे आणि आजूबाजूला भरपूर धरणे असल्याकारणाने जमिनीपासून वाहणारे थंड वारे उन्हाचा त्रास कमी करण्यास मदत करतील. बघायला गेलं तर ट्रेकर्सच्या दृष्टीने सोपा असा समजला जाणारा हा तिकोना मला स्वानंदीला घेऊन चढताना जरासा कठीण वाटला.

तिकोना किल्ला पुण्यापासून जवळ असल्याने आम्ही जरा आरामातच घरातून निघालो. (आरामात म्हणजे सकाळी ९ वाजता ) जुन्या मुबई-पुणे हायवे वरून तिकोनापेठ गाठली.अनेक ठिकाणी रस्त्याची कामे चालू असल्यामुळे आम्हाला पायथ्याशी पोहचायला चांगलाच उशीर झाला. डोक्यावर सूर्य ही तळपत होता. किल्याच्या पायथ्याशी गाडी पार्क करून चढाईला निघेपर्यंत १ वाजला. किल्ला लहान आणि सोपा आहे त्यामुळे आरामात २-३ तासात येऊ अशा विचारात मी होते. नंतर समजलं कि हा निव्वळ माझा गैरसमज होता.

Photo of मिशन २०१९ - किल्ला २ - तिकोना म्हणजे - वितंडगड 2/4 by Snehal Gherade
बाबांसोबत स्वानंदी १ल्या टप्यात

गिरिदुर्ग प्रकारात मोडला जाणारा हा तिकोना किल्ला स्वराज्याच्या दृष्टीने महत्वाचा होता. तो का महत्वाचा होता हे आपल्याला किल्याच्या शेवटच्या टोकाला जाऊनच समजत. किल्याची जमिनीपासूनची उंची साधारण ३५०० फुटाच्या आसपास आहे. किल्ला चढायला उंच असून एकंदर घेरा मात्र लहान आहे. किल्याची एकूण रचना आणि उंची याचा अंदाज घेत हा किल्ला आम्ही ३ टप्यात सर करायचं ठरवलं.

किल्याच्या पायथ्यापासूनच चांगला चढ जाणवला त्यामुळे सुरुवातीला स्वानंदीला घेऊन जाण्यासाठी आदिनाथने मदत केली आणि आधे-मध्ये चेतन काकाने. दरम्यान स्वानंदीला आणि स्वतःला उन्हापासून वाचवण्यासाठी आम्ही शक्य तितकी काळजी घेत होतो म्हणजे पूर्ण सुती कपडे, डोक्यावर टोपी आणि सोबत पाण्याची बाटली वैगरे.

तिकोना चढतांना उन्हामुळे सुरुवातीपासूनच थकवा जाणवायला सुरुवात झाली होती पण किल्ला सर केल्याशिवाय परत फिरणे नाही त्यामुळे आम्ही पुढे वाटचाल करतच राहिलो. उन्हाळ्यात किल्ल्याला भेट द्यायची असेल तर अगदी सकाळीच म्हणजे ७-८ च्या दरम्यान किंवा त्या अगोदरच किल्ला चढायला सुरुवात करायला हवी ही पहिली शिकवण आम्हाला इथूनच मिळाली. पहिला पल्ला चांगलाच मोठा आणि दमवणारा होता.

Photo of मिशन २०१९ - किल्ला २ - तिकोना म्हणजे - वितंडगड 3/4 by Snehal Gherade
दुसरा टप्पा पूर्ण करताना

किल्याचा दुसरा टप्पा खडकाळ होता. दिवाळीत किल्ला बनवण्यासाठी आपण दगडांची ज्या पद्धतीने मांडणी करतो त्या नुसार इथल्या खडकांची रचना मला भासत होती. हा पल्ला देखील बऱ्यापैकी मोठाच होता त्यामुळे वेळोवेळी ५-५ मिनिटांची विश्रांती घेत आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो. जसं जसं वर जात होतो तसतसं ऊनही वाढत होतं पण जमिनीकडून वाहणारे थंड वारे थकवा घालविण्यास मदत करीत होते.

Photo of मिशन २०१९ - किल्ला २ - तिकोना म्हणजे - वितंडगड 4/4 by Snehal Gherade
दुसरा टप्पा पूर्ण करताना
Day 1

वरच्या भागात पोहचून जेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा पवना-मावळचा संपूर्ण परिसर या ठिकाणावरून नजरेस पडला. तेव्हा समजलं कि सुजलाम सुफलाम भूभाग म्हणजे काय. भरपूर पाणी, अनुकूल वातावरण आणि काळी माती याच प्रमाण म्हणजे हा मावळ परिसर.

तुंगचे, लोहगड आणि विसापूरचे एकाच दृष्टिक्षेपात दर्शन

Photo of Tikona Fort, Tikona hiking Trail, Maharashtra, India by Snehal Gherade

उन्हामुळे कि काय पण या किल्यावर अजिबातच गर्दी जाणवली नाही. खरंतर किल्ले नीट अभ्यासायचे असतील तर हा काळ म्हणजे उन्हाळा उत्तम. कारण उन्हाळ्यात किल्ला आणि किल्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ वातावरमुळे नीट पाहता येतो,किल्याची संपूर्ण रचनेचा अंदाज येतो आणि किल्यांवरील पाण्याचे साठे, जमीन यासारख्या गोष्टींचा नीट अभ्यास देखील करता येतो. हा माझा अनुभव आणि तज्ञ लोकांचा सल्ला आहे बरं का !

मुख्य किल्याकडे जाताना

Photo of मिशन २०१९ - किल्ला २ - तिकोना म्हणजे - वितंडगड by Snehal Gherade
Photo of मिशन २०१९ - किल्ला २ - तिकोना म्हणजे - वितंडगड by Snehal Gherade

देवडीमध्ये थंडगार पाणी पिऊन काहीवेळ विसावा घेतला. ही देवडी म्हणजे गडावरील A C च म्हणाव लागेल. गुहेप्रमाणे दगडात असल्याकारणाने ऊन इथं पर्यंत पोहचत नाही आणि गारवा देखील टिकून राहतो. इथे गडावर येणाऱ्या जाणाऱ्यांची नावनोंदणी केली जाते त्यानंतरच प्रवेश दिला जातो.

Photo of मिशन २०१९ - किल्ला २ - तिकोना म्हणजे - वितंडगड by Snehal Gherade

मुख्य किल्याचा प्रवास देवडी पासून सुरु होतो म्हणजे इथून पुढे खरा किल्ला सुरु होतो. इथून पुढची आमची वाटचाल जरा सुखकारक होती कारण पुढचा रस्ता हा हिरव्या झाडांमधून जाणारा होता. हिरवी झाडी आणि लहान मोठे अनेक पाण्याचे टाके शेवटपर्यंत पहायला मिळाली. सोबतच विश्रांतीच्या नावाखाली काकडी, लिंबू सरबत आणि थंडगार ताक याचा सपाटा तर वेगाने चालूच होता.

इथे एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते ते म्हणजे इथे आपल्यासारख्या पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य ती सोय करण्यात आली आहे. त्यामुळे वाटेत पाणी संपलं तरी काळजी करू नये गडावर भरपूर पिण्यायोग्य पाणी सहज उपलब्ध आहे.

Photo of मिशन २०१९ - किल्ला २ - तिकोना म्हणजे - वितंडगड by Snehal Gherade

देवडी नंतर लहानश्या अशा एका सपाट भूभागावर आम्ही पोहचलो. या ठिकाणी मारुतीचे दर्शन घेऊन पुढे चालू लागलो. इथेच आम्ही जुन्या वाड्याचे अवशेष, चुन्याचा घाणा, तळजाई देवीचे मंदिर (लेणी)आणि मंदिराला लागून असलेलं कुंड पाहून पुढच्या वाटेला लागलो.

शेवटचा टप्पा हा माझ्यासाठी सर्वांत कठीण असा होता. साधारण ३०-३५ तीव्र चढण असलेल्या पायऱ्या मला स्वानंदीला घेऊन चढायच्या होत्या. एक आव्हान म्हणून मी ते स्वीकारलं. १०-१५ पायऱ्या चढल्यावरच पायात गोळे आणि मी एकाएकी खालीच बसले. स्वतःच्या शाररीक क्षमतेचा अंदाज मला इथे आला.

तीव्र चढण असलेल्या पायऱ्या

Photo of मिशन २०१९ - किल्ला २ - तिकोना म्हणजे - वितंडगड by Snehal Gherade

या खिंडी सारख्या भागात इतका गारवा होता कि स्वानंदीला डुलकीच लागली. मी देखील अजून जरावेळ बसले असते तर माझी ही अवस्था तिच्यासारखीच झाली असती. थोड्यावेळ शांत बसून स्वतःच्या मनाची तयारी करून पुन्हा उभी राहिले आणि माझ्या मुलीला घेऊन सगळ्यात अवघड असा हा टप्पा व्यवस्थितरित्या पार केला. आनंदाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीच इथे पुरातत्व विभागाने किल्याच्या डागडुजी अंतर्गत याच ठिकाणी नवीन पायऱ्या बांधल्या आहेत ज्यामुळे हा टप्पा पूर्वीपेक्षा जास्त सोईस्कर झाला आहे.

नवीन बांधलेल्या पायऱ्या (किल्ला उतरताना)

Photo of मिशन २०१९ - किल्ला २ - तिकोना म्हणजे - वितंडगड by Snehal Gherade

माझ्यासाठी कठीण असा हा मार्ग पार करत शेवटी आम्ही पुन्हा एकदा एका स्वच्छ अश्या पाण्याच्या कुंडापाशी (पाण्याचे टाके) येऊन पोहचलो. इथलं स्वच्छ, नितळ, मधुर आणि थंड पाणी म्हणजे आमच्यासाठी अमृतापेक्षा कमी नव्हतं.

मधुर पाण्याचे टाके - तळ देखील दिसतो इतकं स्वच्छ पाणी

Photo of मिशन २०१९ - किल्ला २ - तिकोना म्हणजे - वितंडगड by Snehal Gherade

टाकं इतकं स्वच्छ होत कि आम्हाला त्याचा तळ देखील अगदी स्पष्ट दिसत होता. हे पाण्याचं टाकं खडकाच्या आतल्या बाजूस असल्या कारणामुळे सूर्यप्रकाश इथपर्यंत पोहचत नाही. सूर्यप्रकाश पोहचू न शकल्यामुळे या पाण्यात मासे किंवा अन्य जीवजंतूंची उत्पत्ती होत नाही आणि त्यामुळे इथले पाणी बाराही महिने पिण्यायोग्य राहत. या कुंडाला लागूनच एक गुहा आहे जिथे १०-१२ जण अगदी आरामात राहू शकतात. त्यामुळे ग्रुपने जाणार असाल तर गडावर राहण्यासाठी या गुहेचा उपयोग करू शकता.थंडगार अशा अमृता समान पाण्याचा आनंद घेत आम्ही पुढे चालत राहिलो आणि अखेर किल्याच्या अंतिम भागात येऊन पोहचलो ते म्हणजे गडावरील - महादेवाचे मंदिर.

Photo of मिशन २०१९ - किल्ला २ - तिकोना म्हणजे - वितंडगड by Snehal Gherade

इथे पोहचेपर्यंत स्वानंदी झोपी गेली होती. उन्हामुळे आमची देखील चांगलीच दमछाक झाली होती. महादेवाच्या मंदिरात हवा खेळती होती त्यामुळे जरावेळ स्वानंदीला तिथेच झोपवून आम्ही आजूबाजूला फेरफटका मारायला निघालो.

मंदिराच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा खंदक आहे. या खंदकापासून वरच्या बाजूला वळसा घेऊन चढत गेले असता ध्वजस्तंभच्या जागी आम्ही पोहचलो. वाऱ्यावर फडफडणारा हा ध्वज पाहून "शिवाजी महाराज की जय" असा जयघोष केल्याशिवाय राहवत नाही.

खरी मज्जा तर याच भागात आहे. या ठिकाणावरून आपल्याला सिंहगड, तुंग,लोहगड,विसापूर, जांभुळीचा डोंगर, फागणे धरण यासारखी अनेक दूरपर्यंतची ठिकाण आणि आपल्या ओळखीचे किल्ले अगदी सहजच नजरेस पडतात. म्हंणूनच कि काय चारही बाजूस शत्रूवर नजर ठेवता यावी म्हणून टेहळणीसाठी आणि संदेश पाठवण्यासाठी या गिरिदुर्गाला स्वराज्यात अनन्यसाधारण असे महत्व होते. तिकोना हे नाव किती सार्थ आहे जाची जाणीव देखील आपल्याला याच ठिकावरून होते.

मला साद घालणारा - तुंग

Photo of मिशन २०१९ - किल्ला २ - तिकोना म्हणजे - वितंडगड by Snehal Gherade

पण खरं सांगू का इतिहास समजून घेण्यासाठी आणि या महत्वपूर्ण अमूल्य अशा ठिकाणांची महती जाणून घेण्यासाठी किल्यानां जरूर भेट द्यावी यातूनच आपल्याला शिवाजी महाराज आणि आपला महाराष्ट्र समजू शकेल. या ठिकाणी आम्ही एक ते दीड तास थांबलो आणि आजूबाजूच्या परिरसाबद्दल जास्तीत जास्त माहिती घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

प्रवासाची गोड सांगता माझ्या बाळाच्या गोड हास्याने!!

Photo of Tikona Fort, Tikona hiking Trail, Maharashtra, India by Snehal Gherade

कधी जावं - सगळ्या ऋतूत जाऊ शकाल असा किल्ला अगदी उन्हाळ्यात देखील. भरपूर झाडी आहेत त्यामुळे खूप ऊन जाणवत नाही.

कसे जाल - पुण्यापासून- पवनानगर - तिकोनापेठ - तिकोना. सोबत लहान मुले असतील तर कार घेऊन जाणे उत्तम.

संपूर्ण किल्ला पाहायला लागणार वेळ - किल्यावर पाहण्यायोग्य म्हणजे मारुती, वाड्याचे अवशेष,देवीचे मंदिर आणि महादेवाचे मंदिर आहे. यासाठी १-२ तास पुरे. पण संपूर्ण किल्ला चढून उताऱ्यासाठी ४-५ तास वेळ लागतो.

जेवणाची/ रा हण्याची सोय - स्वतःचे जेवण सोबत असेल तर उत्तम. किल्यावर काहीही जेवायला मिळत नाही वडापाव पण नाही. काकडी, ताक,सरबते मिळतात. जेवणाची ऑर्डर पायथ्याशी असलेल्या हॉटेलमध्येदेऊन जावी. राहण्याची खास सोय नाही. किल्यावरच्या गुहेत किंवा तंबू ठोकून परवानगी घेऊन राहू शकता.

सोबत काय घ्यावे - वातावरणानुसार कपडे असावेत. उंची जास्त असल्यामुळे खूप थकल्यासारखं होतं म्हणून सुती आणि सुटसुटीत कपडे असावेत. सोबत १-२ लिटर पाणी,गॉगल आणि टोपी बाळगणे गरजेचे आहे. किल्यावरच्या कुंडातलं पाणी पिण्यायोग्य असल्याने खूप पाणी सोबत घ्यायची गरज नाही. खाण्यासाठी ड्रायफ्रुटस, फळे - सफरचंद, चिक्कू किंवा बोरं सोबत असावीत. लहान मुलांसाठी गुळ-तूप पोळीचा रोल उत्तम.

पार्किंगची सोय - डोंगराच्या पायथ्याशी भरपूर जागा आहे.

२०१९ च्या प्रवासाची सुरुवात रायरेश्वर च्या दर्शनाने झाली त्याबद्दल जरूर वाचा मिशन २०१९ ... किल्ला १.. रायरेश्वर या पोस्ट मध्ये. तसेच माझ्या YouTube चॅनेल स्वच्छंदी (इथे क्लिक करा) ला पण आवश्यक भेट द्या,लाईक करा ,तुमच्या प्रतिक्रिया देखील नोंदवा आणि subscribe देखील करा.

तुम्हाला माझी हि पोस्ट आवडली असेल तर शेजारील फेसबुक, व्हाट्सअप आणि गुगल बटणावर क्लिक करून तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा लेख जरूर शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील जरूर नोंदवा.