मोठ्ठा बाप्पा : बिर्ला गणपती
मोठ्ठा बाप्पा म्हणजे आमच्या लेकीने बिर्ला गणपतीला दिलेले नाव.
घरापासून अगदी जवळ असल्याने बऱ्याच वेळा तिथे गेलेले आहे पण, लॉक डाऊन पासून गेलोच नव्हतो. खरंच ना या कोरोना मुळे माझ्या फिरण्यावर फारच बंधनं घातली आहेत. यावरच बोलत राहिले तर आमचा मोठ्ठा बाप्पा बाजूलाच राहून जाईल. असो.
लेकीला कुठे घेवून जायचे असा विचार करतानाच बिर्ला गणपती एकदम क्लिक झाले. घरापासून १५ मिनिटाच्या अंतरावर असल्याने लगेच गाडी सुरू केली आणि निघालो.
जुन्या पुणे मुंबई (की ओल्ड बॉम्बे हायवे मला कमेंट मध्ये सांगा) रोड ल सोमाटणे फाटा ओलांडला की डाव्या हाताला वळलो की गणपतीला जाता येते. घोरावडेश्वर आले की गणपती हायवे वरून आपल्याला दिसायला लागतो.
टोल नाक्याच्या नंतर वळालो की साधारण ५०० मीटर अंतरावर एक छोटा सिमेंट चा रस्ता डाव्या बाजूला दिसतो. तो डायरेक्ट गणपती मंदिराच्या पायथ्याला पार्किंग मध्ये जातो. २० रुपये पार्किंग चे भरून आपण साधारण ४०-५० पायऱ्या चढून गेलो की आपल्याला दिसतो २८ फूट उंचीचा साधारण तांब्याचा मुलामा दिलेला मोठ्ठा गणपती बाप्पा.
खूपच लोभस रूप आहे या गणपतीचं.एका छोट्याशा टेकडीवर विराजमान बाप्पा, मंदिराचा पण लोभ नाही. आपला मस्त चौरंगावर बसून समोरचे डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य. हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या टेकड्या, घोरावडेश्वर चा डोंगर, बाजूला पिंपरी शहर आणि सतत वाहत असणारा जुना पुणे मुंबई रोड.
गणपतीच्या प्रदिक्षणेसाठी छान चौथरा बांधलेला आहे. मस्त फेरी मारायची, थोडे फार फोटो काढायचे आणि आपले परतीच्या प्रवासाला लागायचे.
एक मस्त हलकी फुलकी ट्रीप पण होवून जाते. यामुळे लेक खुश. ती खुश तर आम्ही दोघे पण खुश.