ALANG-MADAN-KULANG: सह्याद्रीतील त्रिमुख

Tripoto
4th Apr 2019
Photo of ALANG-MADAN-KULANG: सह्याद्रीतील त्रिमुख by Aditya Kundekar
Day 1

मंडळी:

TREKKANICAL (मी )
आदित्य तावाडे (तावड्या)
अक्षय मळेकर (मळ्या)
सनी पाटील (सन्या)
शुभम नेवासे (SBM)
प्रसन्न धुमाळ (सावकार)
स्वप्नील दराडे (काळ्या)
मयूर लोहकणे (मयूर)
टीम दुर्गनाद आणि
सोबत जवळपास अजून 40 ट्रेकर्स (तसा हा ट्रेक दुर्गनाद ने आयोजित केलेला, तरी आम्हीच टीम जोशीले)

AMK म्हणजे अलंग-मदन-कुलंग, प्रत्येक ट्रेकरचं स्वप्न. असच हे स्वप्न आम्ही ही उराशी बाळगून होतो. पण या ट्रेकिंग ला आवश्यक असे climbing gears नसल्याने हा ट्रेक दुर्गनाद सोबत करायचा अस ठरलं होतं. बरेच दिवस वाट पाहिल्यानंतर अखेर दुर्गनादची 20 जानेवारी ला स्टोरी पडली आणि बेत हाकला तो यावर्षीच्या पहिल्याच लागून आलेल्या सुट्टीचा; 26 – 27 जानेवारी. लागूनच होता तावड्याचा बडे: 28 Jan!!!

दुसऱ्याच दिवशी advance रक्कम भरून रजिस्ट्रेशन केला आणि तयारीला जुंपलो. हातात असलेल्या आठवड्याचा पुरेपूर वापर करून गरजेप्रमाणे शॉपिंग उरकून घेतली. सुरुवातीला न ना चा पाढा गाणाऱ्या काळ्यानेही मयूर सोबत वाइल्ड कार्ड एन्ट्री केली. सगळी तयारी एकदम व्यवस्थित झाली होती, आता प्रश्न होता तो फक्त सुट्टीचा. 25 Jan ला रात्री निघायचे होते आणि दुर्दैव म्हणजे माझी 2nd शिफ्ट!!! शिफ्ट adjustment ची सगळी समीकरणे मांडून झाली पण ‘X’ काही मिळाला नाही. शेवटी सोमवारी आरामासाठी आणि तावड्याच्या Bday साठी जपलेला C-off शुक्रवारीच घ्यायचा ठरलं.

बघता बघता शुक्रवार आला आणि ठरल्याप्रमाणे मी दांडी मारली. सनी पण हाल्फ डे घेऊन अचानक घरी निघाला. जाता जाता घरच्या जेवणाचं आमिष दाखवून मला ही घेऊन गेला. आवडत्या मेथीच्या भाजीबरोबर पोट भर जेवण करून, दुपारी पुणेरी झोप घेतली. संध्याकाळी पिझ्झा खाऊन शिवाजीनगर निघालो. दोन दिवसांपूर्वी दराडेचा bday होता, म्हणून belated celebration साठी बाकी मंडळी सुद्धा JM कॉर्नर ला जमणार होते. सनीच्या काकांची कार ही त्याच दिशेने जाताना भेटली म्हणून ठरल्यावेळेत आम्ही JM कॉर्नर ला पोहोचलो.

हळू हळू बाकी मंडळीही जमा झाली. जेवणाचा काही प्लॅन नसल्याने तिथेच पेटपूजा सुरू झाली. पिझ्झा खाल्याने मला काही जास्त भूख नव्हती म्हणून मी काही ऑर्डर न करता पिसाळची NINJA TECHNIQUE वापरून सगळ्यांच्या ताटात हाथ साफ करून घेतला. काही कारणास्तव Bday Celebration तावडे सोबत करायचा ठरलं, फक्त गिफ्ट म्हणून घेतलली बॅग ट्रेकिंग ला कामाला येईल म्हणून आताच देऊन मोकळे झालो. बराच वेळ गप्पागोष्टी केल्यानंतर शिवाजी नगर रेल्वे स्टेशन कडे रवाना झालो. स्टेशन वर सुरुवातीला कोणीच ओळखीच दिसत नव्हता, थोड्या वेळात मात्र इंस्टाग्रामच्या बऱ्याचश्या प्रोफाइल स्टेशन वर इकडे तिकडे फिरताना दिसू लागल्या. इतक्यात सावकार आणि मयूर ही येऊन पोहोचले होते. दुर्गनाद च्या admin ला रिपोर्ट करून आम्ही पुन्हा बाकी मंडळींना जॉईन झालो. बराच वेळ गेल्यानंतर बाकी मंडळींना घरी जाण्याची परवानगी देऊन आम्ही सर्व स्टेशनच्या पलीकडे निघालो.

पलीकडे रस्त्याला लागूनच 52 seater बस उभी होती. थोडं लेट गेल्याने फक्त पुढचे बेंच रिकामी राहिले होते. यावेळी 2nd लास्ट सीट ऐवजी 2nd सीट वर सनी आणि मळ्या सोबत बसावं लागल अगदी कॉलेज प्रमाणे. सनी आणि मळ्याने अगोदरच अडीज सीट व्यापली होती त्यात सोबत म्हणून सीट पण थोडी वाकडी होती. कधी इजेक्ट होईन याचा भरोसा नव्हता. अशा अवस्थेत पाच तासाचा शिवाजीनगर- आंबेवाडी असा प्रवास करायचा होता. रात्र भरात सगळी झोपासने वापरून झाली, पण झोपेचा काही सुगावा लागला नाही.

भल्या पहाटे, गाव साखरझोपेत असताना आम्ही आंबेवाडी गावात दाखल झालो. बस मधून बाहेर पडताच थंडीचा कहर जाणवला. आमच्या अगोदरच दुसरा एक ग्रुप गावात हजर होता. त्यांनी पेटवलेल्या शेकोटीचा आसरा घेऊन चहा पोहे खाल्ले. शेकोटीचा शेक घेत असताना आमच्या कानाला शेकणारा, दराडेला तोड देईल असा दुर्गनाद चा मेंबर मिळाला. निघायला बराच वेळ असल्याने मी रात्रीची आधी अधुरी झोप पूर्ण करायला बस मध्ये गेलो. तीन सीट्स वर निवांत पसरून डायरेक्ट साखर झोपेत गेलो. तासाभराने ग्रुप लीडर ने कॉल दिला. फ्रेश होऊन सगळे एकत्र जमले, सगळ्यांनी आपआपले introduction दिले. काही नवखे होते तर काही पक्के रंगलेले. थोडे तर अलंग मलंग कुलंगच्या शोधात होते, तर काही जण पुण्याच्या बाहेरचे, खास ट्रेक साठी आलेले. सगळ्यांचा Introduction झाल्यावर प्रत्येकाला आठवण म्हणून दुर्गनाद ने batch वाटले आणि सोबतच biscuits अँड चिक्की!!!

अखेर सहाच्या सुमारास मोर्चा निघाला. थोडा वेळ डांबरी रस्त्यावरून चालत वळणावर पोहोचलो, वळणाला मागे टाकून मळकट वाटेवरून जंगलात शिरलो. हिवाळा असल्याने अजून थोडा अंधारच होता, तरी चांदण्यांच्या मंद प्रकाशात पायवाट स्पष्ट दिसत होती. जस जसे आम्ही वाटेने वरती जंगलातून माघ काढत होतो, तस तसा सूर्य ही डोंगरामागून वरती येत होता. अधून मधून विश्रांती घेत, सोबत असलेले buscuits, चिक्की खात, गुलाबी थंडीत सगळे मेंढरांप्रमाणे वाट तुडवत होते. हरिश्चंद्रगडला जन्माला आलेल्या जोशीले ग्रुप च्या नावाप्रमाणेच आमची मंडळी सगळ्यात पुढे, अगदी गाईडच्या ठस्यांवर पाय ठेवत.

जवळपास एका तासाची पायपीट केल्यानंतर आम्ही एका रॉकपॅच पाशी पोहोचलो. सकाळच्या गारव्यात दगड विंचूवानी थंड पडला होता. थंडीचे चटके सोसत वरती चढताना वाटेत सामना झाला तो म्हणजे Error 404 शी… काळ्याने आपल्या अंगातला gulli boy जागा करून यावर रॅप केला. कसाबसा माघ काढत शेवटी आम्ही अलंग-मदन च्या खिंडीत असलेल्या गुहे पाशी पोहोचलो. आमच्या अगोदर आलेल्या ग्रुप ने गुहेचा अगोदरच आश्रम केलेला. आमच्या बाकी मंडळीना पोहोचायला अजून वेळ असल्याने, आम्ही डाव्या अंगाला असणाऱ्या अलंग च्या रॉकपॅच खाली sunkissed वाले काही फोटो टिपले.

बाकी मंडळी येताच आम्हीही गुहेतच खांद्यावरचं ओझं कमी केलं. सोबत फक्त QUENCHUA ची लहान बॅग, त्यात पाणी आणि मोजक खाऊ असा घेऊन उजव्या अंगाला असलेल्या मदन कडे निघालो. वाटेतले Error 404 चुकवून अलंगच्या कुशीतून मदनच्या कुशीत शिरलो. मदनच्या कुशीत ढासाळलेली वाट, तोडक्या मोडक्या पायऱ्या असल्याने सुरक्षिततेसाठी दोर आहे. दोरीच्या साहाय्याने, दबक्या पावलांनी आम्ही मदनच्या रॉकपॅच जवळ पोहोचलो. इथे चढाई थोडी कठीण असल्याने climbing setup लावला होता.

या 30-40 फूट चढाईसाठी भली मोठी रांग लागली होती. जवळपास अर्धा-पाऊण तास पायरीवर तग ठोकून बसल्यावर कुठं आमचा टोकन आला. सुरुवातीला सनीला पुढे पाठवून दोरीची मजबुती बघितली. मागोमाग एक एक जण मावळा क्लाइंबिंग करून वर आले. कड्याच्या काटाने वाट काढत मदन वर नेणाऱ्या शेवटच्या पायऱ्यांपाशी जमलो. इथून दिसणारा चंद्राकार अलंग पाहून दिवस चांदण्यांची सैर झाली. जमेल तितके कोपरे पकडून, पोझ घेऊन अलंग फोटो मध्ये बसेल याची काळजी घेतली. बराच वेळानंतर गर्दी वाढल्याचे बघून माथ्याकडे निघालो.

मदनच्या माथ्यावर जाताना वाटेत चार पाण्याची टाकी लागली, पाणी मात्र तळाला लागलेलं. पुढे एकाच वेळी निदान पन्नास लोकांची पंगत हमखास उठेल अशी एक चौकोनी आकाराची टोलेजंग गुहा कातळात आहे. अगदी माथ्यावर म्हणजे मदनच्या नेढ्यावर भगवा दिमाखात फडकताना दिसतो. इथून दिसणारा कुलंग चा नजाराही मनाला भिडून गेला. एकंदरीत मदन वरून अलंग आणि कुलंग सोबत इतर अवाढव्य सह्याद्रीची श्रीमंती ही दिसते. इथेच दगडावर ठाम ठोकून कुलंगलाही कॅमेराबद्ध केलं. सगळी मंडळी वर येताच, सगळे प्रजासत्ताक दिनासाठी सज्ज झाले. सह्याद्रीच्या अफाट श्रीमंतीत प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे सुखच निराळं!!! एका सुरात राष्ट्गीत गाताना अंगावर काटा येण्यापासून कोणीच वंचीत राहिल नसावं.

उतरताना ही तीन ग्रुप एकत्र आल्याने रॉकपॅच पाशी भयंकर गर्दी झाली आहे असं समजलं. म्हणून आम्ही अजून थोडा वेळ वरतीच काढायचा ठरवलं. संधीचा फायदा घेऊन सगळ्यांनी आराम केला, कोणी टाक्यांशेजारी तर कोणी गुहेजवळ सावली भेटेल तिथे विसावले. याच प्रसंगी मळ्या आमच्यापासून दुरावला. अखेर बाराच्या सुमारास खालून कॉल आला आणि आम्ही उतरायला सुरुवात केली. जाऊन पाहतो तर काय गर्दी CONSTANT!!! इथे कड्याच्या कपारीत भलताच गार वारा घोंगावत होता. उन्हाच्या शोधात पाय माघारी फिरले पण सूर्य ही वेळेत पलीकडे निघाला. सोबत लागलेल्या भयंकर भूखेमुळे सगळ्यांचीच पार दैना झाली होती. तरीसुद्धा आमचे जोशीले गरमच!!! मस्ती मस्करी अजिबात कमी नव्हती. दीड-दोन तास वाट बघितल्यानंतर कुठे नंबर लागला आणि दीड-दोन मिनिटात ड्रॉप डाऊन केला. काळ्या मात्र लोकसेवेत गुंतल्याने सावलीप्रमाणे सगळ्यांच्या शेवटी आला. तोपर्यंत बाकी मंडळी पुढे जाऊन अलंगच्या रांगेत उभी राहिली.

भर भर रास्ता कापत, खिंडितली गुहा गाठली. गुहेत ठेवलेला बोझा पुन्हा खांद्यावर लादला. समोर असलेला छोटासा रॉकपॅच दोरीच्या साहाय्याने चढून मुख्य रॉकपॅच ला जाणाऱ्या तोडक्या-मोडक्या पायऱ्यांवर नंबर लावला. आता समोर उभा होता 80°- 90° असलेला 80-90 फूट उंच असा रॉकपॅच. इथेही तीच तुफान गर्दी, एका बाजूने उतरणाऱ्यांची तर एका बाजूने चढणाऱ्यांची. निवांत बसकण मारून सोबत आणलेला असेल नसेल तितका खाऊ निपचित गिळून तात्पुरती भूख भागवली. इथेही जवळपास दीड-दोन तासांनी उतरणाऱ्यांची गर्दी संपली, आणि हा घोळका मदनला मुक्कामाच्या बेताने निघाला. आता उतरणाऱ्यांच्या बाजूने बॅग वरती चढू लागल्या. लवकरच माझा नंबर लागला, सुरुवातीला रॉक क्लाइंबिंग करत दोन पावलं पुढे टाकली, पण वेळेअभावी पुढे मावळा क्लाइंबिंग करून वरती असलेल्या गुहेत पोहोचलो. गुहेत पडलेली बॅग उचलून शेवटच्या पायऱ्या कशाबशा धापा टाकत चढलो. उरलेल्या बॅग्स सुद्धा साखळी करून वरती घेतल्या आणि अखेर दिवस मावळतीला आम्ही अलंग गाठला. वरती पोहोचताच सर्वप्रथम मदनच्या दिशेने पळालो. अलंगचा चंद्राकार आकाराचा पठार बराच विस्तारित आहे. इथूनच आजूबाजूचा सर्व परिसर photo sphere मध्ये बसवून पुन्हा खाली थांबलेल्या मंडळींना गाठले.

सगळे सुखरूप वरती आलेत याची खात्री करून अलंगच्या गुहेकडे आगेकूच केली. वाटेत एक शिवलिंग आणि तळे लागते, तळ्यातला पाणी पिण्याजोग आहे हे निरखून सर्व रिकाम्या बाटल्या भरून घेतल्या. अलंगच्या कातळात असणाऱ्या या दोन गुहा अगदी लोणावळ्यायतल्या एका बंगल्यासारख्या, आतमध्ये ऐसपैस चार-पाच खोल्या, त्याहून दुप्पट terrace, बाहेर पडताच पाण्याचं टाकं. एकंदरीत थंडीत रात्र काढायला साजेल असा हे ठिकाण. गुहेत शिरताच प्रत्येकाने आवडी निवडी नुसार रूम बुक केल्या, लवकर पोहोचण्याचा हाच एक फायदा. थोड्याच वेळात किचन मधून चहाचा वास दरवळला, सोबत वरण भात ही. सगळी काम आहे तिथे टाकून मंडळी खाण्यात गुंग झाली. युगायुगांची भूख भागवून मग आम्ही गुहेवर असणाऱ्या अकरा टाक्या बघायला निघालो. या टाक्यांची रचना खरच बघण्यासारखी आहे. आता अंधार वाढत असल्याने लोक परतीच्या वाटेला निघाले. मी, दराडे, मयूर मात्र बाकी काही मंडळींसोबत अलंगच्या टोकाकडे निघालो. तिथे पाहण्यासारखे महादेवाचे मंदिर, दीपमाळ आणि काही उध्वस्त वास्तू आहेत. सोबतच पाण्याच्या टाक्या पण आहेत, तिथेच थंडगार पाण्यात फ्रेश झालो. एव्हाना घुडूप काळोख झाला होता म्हणून परतीच्या वाटेला लागलो. मोबाईल च्या टॉर्च मध्ये बाकी काही मेंबर्स सोबत नव्याने वाट बनवत गुहेच्या दिशेने येणाऱ्या गाण्यांच्या आवाजाकडे निघालो. गुहेजवळ मस्त मेहफिल रंगली होती. पोहोचताच क्षणी त्यात मी लाढघर चा रीमिक्स पॅटर्न घुसवला.

दुसरीकडे मुंबईचा ग्रुप गुहेवर चढून आला होता, त्यांची पेटपूजा चालू होती. यांच्या सोबत आवडीने निवडलेल्या जागेसाठी पुन्हा थोडे झटावे लागले. मयूर चा ऐकून मी सोबत आणलेली मॅट गाडीतच टाकून आलेलो. खाली अंथरायला काहीच नसल्याने झाडाची पानं घ्यावी असा ठरला, पण अंधारात आता तेही शक्य नव्हतं. अखेर कसेबसे दोन टेंट टाकून सावकारांच्या मदतीने जागा अडवली. संध्याकाळी सात ला जेवण करून ही नऊच्या सुमारास भलतीच भूख लागली होती. मुंबईच्या ग्रुप साठी केलेल्या जेवणातच हाथ साफ केला. बराच वेळ गप्पा गोष्टी करून, झोपेच्या तयारीला लागलो. एकात बारीक बांध्याचे पाच तर दुसर्यामध्ये लठ्ठ चार असा पॅटर्न आखून टेंट मध्ये शिरलो. बाहेर बाकीच्यांचा अजून जागेसाठी कल्ला चालूच होता, तरी दिवसभराच्या थकव्यामुळे पडताच क्षणी डोळा लागला.

ठेवणीतल्या आठवणी:

१. मी नुकताच नव्याने शिकलेलं भजन “पळा पळा ग बाई… पळा पळा ग बाई…पळा पळा ग बाई पळा…..
२. सनीने वेळोवेळी मळ्याच्या सद्दा-अड्डा वरच्या काळ्या करतुदींचा घेतलेला बदला.
३. Error 404!!!
४. मुंबईच्या ग्रुप सोबत वेळोवेळी झालेली तडझोड.

मी TREKKANICAL ……8.02 PM, @JM Corner

Photo of ALANG-MADAN-KULANG: सह्याद्रीतील त्रिमुख by Aditya Kundekar

मी सोडून सगळे….. 8.45 PM, 25.01.19

Photo of ALANG-MADAN-KULANG: सह्याद्रीतील त्रिमुख by Aditya Kundekar

मनाच्या डोळ्यांनी दिसणारा AMK ….. 4.01 AM

Photo of ALANG-MADAN-KULANG: सह्याद्रीतील त्रिमुख by Aditya Kundekar

मदन (mandatory pose ) ….. 7.07 AM

Photo of ALANG-MADAN-KULANG: सह्याद्रीतील त्रिमुख by Aditya Kundekar

त्रिकुट …..7.16 AM

Photo of ALANG-MADAN-KULANG: सह्याद्रीतील त्रिमुख by Aditya Kundekar

404 वाला रॉकपॅच ……7.34 AM

Photo of ALANG-MADAN-KULANG: सह्याद्रीतील त्रिमुख by Aditya Kundekar

अलंग – मदनच्या खिंडीत…..8.04 AM

Photo of ALANG-MADAN-KULANG: सह्याद्रीतील त्रिमुख by Aditya Kundekar

अलंगच्या कुशीतून मदनच्या कुशीत जाताना…..8.23 AM

Photo of ALANG-MADAN-KULANG: सह्याद्रीतील त्रिमुख by Aditya Kundekar

मदनचा रॉकपॅच….9.13 AM

Photo of ALANG-MADAN-KULANG: सह्याद्रीतील त्रिमुख by Aditya Kundekar

मदनवरून दिसणारा चंद्रकार अलंग….9.37 AM

Photo of ALANG-MADAN-KULANG: सह्याद्रीतील त्रिमुख by Aditya Kundekar

मदनच्या शिखरावर फडकणारा भगवा (सोबत चांदोमामा )….9.51 AM

Photo of ALANG-MADAN-KULANG: सह्याद्रीतील त्रिमुख by Aditya Kundekar

अलंग वरून दिसणारा कुलंग....11 AM

Photo of ALANG-MADAN-KULANG: सह्याद्रीतील त्रिमुख by Aditya Kundekar

वाटेत उभा ठाकलेला अलंगचा रॉकपॅच….4.47 PM

Photo of ALANG-MADAN-KULANG: सह्याद्रीतील त्रिमुख by Aditya Kundekar

बाप्पा सोबत बाप्पा….. 5.23 PM

Photo of ALANG-MADAN-KULANG: सह्याद्रीतील त्रिमुख by Aditya Kundekar

आमचं पंचपकवान …..5.50 PM

Photo of ALANG-MADAN-KULANG: सह्याद्रीतील त्रिमुख by Aditya Kundekar

अकरा टाक्यांच जाळ…..6.36 PM

Photo of ALANG-MADAN-KULANG: सह्याद्रीतील त्रिमुख by Aditya Kundekar

उध्वस्त वास्तू….. 6.41 PM

Photo of ALANG-MADAN-KULANG: सह्याद्रीतील त्रिमुख by Aditya Kundekar