जितक्या लवकर झोप लागली होती तितक्याच लवकर जाग आली, उश्यापाशी असलेला मोबाइल बघितला तर पहाटेचे चार वाजलेले. मंदिरात तशी थंडी नव्हती पण हवेमुळे मंदिराचे पत्रे तांडव घालत होते. अशा धिंगाण्यात परत झोप लागणं कठीणच वाटत होतं, तरी सुद्धा निपचित पडून राहण्यातच सुख होत. कदाचित म्हणूनच पुजारी मामांनी मोकळ्या वाड्यात हवेशीर मुक्काम ठोकला असावा. काल रात्री ठरल्याप्रमाणे सगळे अलार्म त्यांच्या ठरल्या वेळेला म्हणजे सहा ला उठून बसले, पण आम्ही मात्र थंडीमुळे उठण्याच्या तयारीत नव्हतो.
सुकृत मात्र सूर्योदय बघण्यासाठी उठून निघून गेला. थोड्यावेळानंतर झोप उडवण्यासाठी खुद्द सूर्यनारायण मंदिराच्या दारी आले. सोनेरी सूर्यास्तानंतर असा सुखद सूर्योदय सोडून चालणार नाही म्हणून आळस सोडून आम्हीही पूर्वेच्या दिशेने निघालो.
सुर्योदयाचा आनंद घेत बोलतेकडे पालते घातले. तसेच टकमक टोक जाण्याचा बेत होता पण वेळेअभावी शक्य झालं नाही. सुकृतने मात्र भल्या पहाटे उठून जमेल तितका गड तुडवला होता. परतीच्या मार्गाला येता येता दारुगोळा कोठार चाचपून आलो. इथेही अगोदरच लूट (PUBG style) झाली होती, उरलेले ते फक्त अवशेष!!! मग संतोष मामांनी सांगितल्याप्रमाणे चहा नाश्त्यासाठी आम्ही थेट वाडा गाठला.
पुजारी मामा पूजेच्या तयारीत गुंतले होते तर त्यांचा सोबती चुलीमध्ये फुंकर मारण्यात व्यस्त होता. बहुतेक थंडीमुळे यांनाही उठायला उशीर झालेला, यावरून इतका मात्र समजला की पालीची पहिली बस भेटणं आता कठीणच. काळोख्या रात्री अजून एक ग्रुप चढाई करून वाड्यात मुकामाला आलेला, ते ही नाश्त्याच्या तयारीत होते. बघता बघता चहा आणि पोह्यांचा घमघमित सुवास दरवळला आणि अजून एक ग्रुप नाश्त्याला येऊन पोहोचला; माकडांचा. दुसरीकडे आम्ही आमची शिदोरी मंदिरात विसरल्याने वाडा टिपण्यात; वाड्याच्या भिंतीकडून जमेल तितका इतिहास गोळा करण्यात मग्न होतो.
तीन-चार चहा भुरकून, थंडीला टाटा बाय-बाय करून आम्ही मंदिरात आलो. बॅगेतला सुका मेवा खाऊन, मंदिरातला पसारा आवरून पुढच्या स्वारीला तयार झालो. रात्री अंधारात मंदिराचा परिसर पाहता आला नव्हता, सकाळी मात्र उन शेकत आजूबाजूला फेर फटका मारला. हनुमान मंदिर, वीरांच्या समाध्या (वीरगळ) अशा बऱ्याच ऐतिहासिक वास्तू मंदिराच्या आजूबाजूला आहेत.
बऱ्याच वेळानंतर मामांचे सोबती दुसऱ्या ग्रुप साठी डब्बे आणायला घरी निघाले. आम्ही पण त्यांच्या सोबत धोंडसे गावाच्या दिशेने निघालो, सुधागड वर येणारा हा दुसरा मार्ग.
सोबत अजून दोन गाईड (जुईचे वैरी) घेऊन आम्ही घनदाट दाटीतून ताज्या oxygen चा आस्वाद घेत महाद्वारापाशी पोहोचलो. अतिशय भव्य राजधानीला साजेल असा हे महाद्वार. पण काही कारणास्तव राजधानीच्या स्पर्धेतून सुधागडला माघार घ्यावी लागली होती. थोडा वेळ महाद्वाराची बांधणी बारकाईने पाहून आम्ही पुन्हा वाटेला लागलो.
बराच वेळ छोटे मोठे दगड-धोंडे तुडवत आम्ही वाटेत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकी पाशी पोहोचलो. तैलबैला वरून येणारी वाट सवास्निच्या घाटामधून इथेच उतरते. रिकाम्या झालेल्या सगळ्या बॉटल्स भरून घेतल्या. सुधागड कडे जाणारा पहिला ग्रुप इथेच भेटला, त्यांना सोबती म्हणून आमचा एक गाईड त्यांच्या सोबत परतला. पुढे अजून दोन-तीन ग्रुप गाठ पडले, वाटेवर जागोजागी बा रायगड परिवाराने निळ्या पाठया लावल्या आहेत, त्यामुळे चुकामुक होण्याची शक्यता कमी आहे. खर तर ही वाट पाछापूर च्या वाटेपेक्षा बराच दमछाक काढणारी आहे. तरी ही वाट डोंगराच्या दरीतून जात असल्याने सूरज मामाचा काहीच पत्ता नव्हता, वर घनदाट जंगलामुळे गुलाबी थंडीत काहीच थकवा जाणवत नव्हता.
जवळपास एका तासा नंतर सूर्याच पुनरागमन झालं. पुढे सुखलेली दातपाडी नदी पार करून आम्ही नदीपात्राच्याच्या बाजूने पुढे निघालो. बघता बघता गावच्या पांधीतल्या पायवाटेला लागलो. बरोबर 10.30 AM च्या सुमारास आम्ही गाव गाठलं. ST स्टँड जवळ असल्याने आम्ही संतोष मामांच्या घरी, व्हरांड्यातच पसरलो. तोंडावर पाणी मारून अंघोळ आटपली आणि थोडंफार सोबत आणलेला खाऊ खाल्ला.
नेहमी प्रमाणे 11 AM ची ST 11.15 AM ला आली आणि आम्ही पालीकडे रवाना झालो.इथेही 2nd लास्ट सीट वरच हक्क गाजवला. बसताच क्षणी गाढ झोप लागली, आणि जाग लागली ती पाली ला पोहोचल्यावरच. एका तासात रात्रीच्या पाच तासाची झोप पूर्ण झाली होती. तसाच आळस अंगी घेऊन खाली उतरलो.
दुपारचे बारा वाजलेले, सूर्य थेट डोक्यावर होता, आता मात्र सूर्याचा खरा रंग दिसत होता. नुकताच भरपेट नाश्ता केल्याने जेवण स्कीप केले. फक्त उसाचा रस घेऊन, तिथेच सरसगडचा पत्ता विचारून थेट त्या दिशेने निघालो.
बराच वेळ डांबरी रस्ता तुडवल्यावर आम्ही पाली अष्टविनायक मंदिरापाशी पोहोचलो. मंदिरातून थेट बाहेर पडल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूलाच सरसगडची पाटी दिसली. नकाशा व्यवस्थित वाचून आम्ही गाव मागून जाणारी पायवाट पकडली. ही वाट घरांच्या परड्यातून थेट गावच्या स्मशानाकडे जात होती. आजूबाजूने दाट झाडी होती, मात्र डोक्यावर काहीच छत नव्हता. या उन्हाच्या सोबतीला माझा घसा ही सुरात साद घालत होता. दर पाच मिनिटाने ब्रेक घेणं बंधनकारक झालं, सावलीच्या शोधात पायवाट सोडून दाटीवतीत शिरत होतो. या नादातच एकदा रस्ताही भटकलो. सोबत आमच्या मागून येणारी लहान मुलं ही भरकटली. मनातच चार शिव्या घालून पोरांनी पण ओव्हरटेक केला. शेवटी अर्ध्या तासाने कसाबसा रॉकपॅच पाशी पोहोचलो. आता हालत अजून बिकट झाली होती, मी माघार घेण्याचा विचार करत होतो, खर तर माझा मयऱ्या झाला होता. (हरिश्चंद्रगड चा किस्सा आहे लवकरच तुमच्यासमोर मांडेन)
तितक्यात जुईने sneakers ची आठवण केली. Sneakers मुळे एक वेगळीच ताकद संचारली. चटकन रॉकपॅच चढून पायऱ्यांच्या पायथ्याशी असलेल्या गुहेत शिरलो. आत घुडूप अंधारातला गारवा मनाला थोडी शांती देऊन गेला. माचीवर जाणाऱ्या पायऱ्यांवर थोडे फोटो टिपून शेवटच्या टप्प्याला सज्ज झालो. दक्षिणेस कातळ कड्यात कोरलेल्या या पायऱ्या भलत्याच उंच आहेत, आणि त्याही जवळपास 80°. अधून मधून पायऱ्या तुटलेल्या असल्याने कातळाला आलिंगन देतच चढत होतो… पायऱ्या मोजत अखेर आम्ही दिंडी दरवाजा पाशी पोहोचलो.
पाली दरवाजा नेहाळून आम्ही माचीवर पोहोचलो. दोन्ही बाजूला असलेल्या बुरुजांवरून पाली गाव आणि आजूबाजूच्या परिसराची टेहळणी केली.
नकाशा नुसार पुढचा रस्ता उजवीकडे होता पण डाव्या बाजूला सुद्धा एक पायवाट गेली होती. बालेकिल्ल्यावर जाणारा शॉर्टकट असावा म्हणून मी पुढे जाऊन पडताळणी केली. SNICKERS चा जोश बराच वरती घेऊन आला, पण पुढे थोडा अवघड पॅच होता, त्यापुढे काय आहे हे सांगणे कठीण होते. म्हणून वेळ वाया नको म्हणून मी पुन्हा खाली उतरलो नि आम्ही उजव्या पायवाटेला लागलो. चक्क बालेकिल्ल्याला वळसा घालून, चोहीकडचा नजारा अनुभवून आम्ही शेवटी रॉक पॅच पाशी पोहोचलो. अगदी जिथे तो डावीकडचा रास्ता मिळणार होता तिथे. सरळतोंडी घेता येणारा घास आम्ही मानेमागून घेतला. पण वळसा घातल्याने बालेकिल्ल्याच्या कुशीत असलेल्या बऱ्याच गुहा, पाण्याच्या टाक्या आणि आजूबाजूचा परिसर पाहता आला. सरसगडावर कमीत कमी दहा पाण्याच्या टाक्या आहेत पण त्यातलं एकही पिण्याजोगं नव्हतं.
गडाच्या माथ्यावरही जास्त झाडी नसल्याने उन्हाचा मारा चालूच होता. म्हणून आम्ही सरळ तलावाला लागूनच असलेल्या महादेवाच्या मंदिरात विसावा घेतला. वाटेत एक पीर ही होत. उरलेल सगळं खाद्य भंडार खाऊन फस्त केलं. अर्धा तास मोबाइलमध्ये असलेलं एकमेव गाणं PERFECT ऐकत आराम केला. नंतर भगव्यासोबत बराच वेळ फोटोशूट केला.
दुपारच्या वेळी माथ्यावरून सुधागड, तैलबैला आणि घनगड स्पष्ट दिसत होते. असा हा नजारा डोळ्यात भरून सुमारे साडे तीन वाजता आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. यावेळी मात्र शॉर्टकट निवडला, थोडी खटाटोप करून बालेकिल्ल्याचा भोवाडा वाचवला. जीव मुठीत घेऊन, सावकाश पणे खिंडीतल्या पायऱ्या उतरलो. रॉकपॅच नंतर उरलेला भाग भुस-भूशीत मातीने भरलेला असल्याने इथेही अगदी पावलं मोजत उतरलो.
सावकाश उतरल्याने पायावर भर पडलेला, त्यामुळे पाय लडखळत होते. सुकृतच्या सांगण्याप्रमाणे यावर उपाय म्हणून सपाट जागेवरून आम्ही थोडं उलट चाललो, आणि खरच याचा परिणाम चांगला झाला. काहीतरी नवीन शिकता आलं यातच भाग्य. उरलेल्या रानातून भरभर पावलं टाकून एका तासात आम्ही पायथा गाठला. अष्टविनायकाच्या मंदिरात फ्रेश झालो, थंडगार पाणी पिऊन तहान भागवली. मंदिरात न जाताच प्रसाद विकत घेऊन मंदिराबाहेर पडलो.
ST ला अजून बराच वेळ असल्याने मंदिरा बाहेरच नाश्ता केला. पोटभर खाऊन-पिऊन दिंडी पाली स्टेशन कडे वळवली. पाली ST स्टेशन पोहोचताच सुकृतची ठाणे बस आली. ठाणे बस निघून जवळपास तासभराने पुण्याला जाणारी बस आली, अगदी तुडुंब भरून. अर्धा तास उभा राहून प्रवास केल्यानंतर कुठेतरी बसायला भेटलं. लोणावल्यामध्ये रात्रीचा जेवण उरकून बस पुढे निघाली. तीन तासांच्या प्रवासानंतर मी निगडीला उतरलो आणि जुई त्याच बसने पुढे शिवाजीनगर ला गेली. निखिल ला बोलवून लगेच घर गाठलं आणि अश्या रीतीने सुखरूप रित्या सुधागड-सरसगड ट्रेक पार पडला. फक्त एकाच गोष्टीची खंत होती. ती म्हणजे, मी तिकडे पालीमध्ये रानावनात भटकत असताना, इकडे पुण्यात आमच्या पालीचा (प्रेरणाचा) अचानक, belated B’day साजरा केला. या अनुउपस्थितेची जाणीव अधून मधून कानी पडते.